
एसीबीच्या सापळ्याची चाहूल लागताच फोन ‘स्विच ऑफ’


कंधार, सचिन मोरे| आईच्या नावावर असलेली वडिलोपार्जित शेतजमीन तक्रारदाराच्या नावावर करण्यासाठी १२ हजारांची लाच मागितल्या- प्रकरणी कंधार तालुक्यातील नंदनवन सज्जाचे तलाठी हे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) कारवाईच्या रडारवर आले आहेत. एसीबीच्या पडताळणीत लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. मात्र, सापळा कारवाईच्या वेळी तलाठी कार्यालयात अनुपस्थित राहिले आणि त्यांचा मोबाईल फोन बंद असल्याचे आढळून आले. लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्याने कंधार पोलीस ठाण्यात तलाठ्या-विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


तक्रारदार शेतकऱ्यांने ४ ऑगस्ट २०२६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नांदेड यांच्याकडे नंदनवन सज्जाचे तलाठी पालसाहेब मुंडे यांच्या विरोधात तक्रार दिली. तक्रारदाराची नंदनवन येथील गट क्रमांक ३३६ मधील ०.५५ आर शेतजमीन ही वडिलोपार्जित असून ती तक्रारदाराच्या आईच्या नावावर आहे. सदर जमीन आपल्या नावावर करण्यासाठी तक्रारदार तलाठी पालसाहेब आनंदराव मुंडे यांना भेटले असता, त्यांनी काम करून देण्यासाठी १२ हजार रुपयांची मागणी केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले.


त्यानंतर ५ ऑगस्ट रोजी दुपारी सुमारे २.१५ वाजता कंधार येथील तलाठी कार्यालयात एसीबीने तक्रारीची पडताळणी केली असता तलाठी मुंडे यांनी १२ हजारांची लाच मागितल्याचे तसेच ती रक्कम स्वतः स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याचे पडताळणीत निष्पन्न झाले.


दरम्यान, १४ ऑगस्ट रोजी तक्रारदाराने तलाठी मुंडे यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला असता ते कार्यालयात उपस्थित नव्हते. तक्रारदाराने तलाठ्यांच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता फोन बंद असल्याचे आढळले. त्यानंतर १७ ऑगस्ट रोजीही भेटीचे ठिकाण निश्चित करण्यासाठी फोन केला असता मोबाईल पुन्हा बंद असल्याचे निदर्शनास आले.
एसीबीच्या कारवाईची चाहूल लागल्याने तलाठी मुंडे यांनी लाचेची रक्कम स्वीकारली नसल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. तसेच ते कर्तव्यावर हजर नसल्याचेही आढळून आले. त्यामुळे प्रत्यक्ष सापळ्यात लाचेची रक्कम हस्तगत होऊ शकली नाही.
या प्रकरणी कंधार पोलीस ठाण्यात फिर्यादी एसीबीचे पोलीस निरीक्षक अर्चना करपुडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर ३२२४/२०२६ नुसार भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ मधील कलम ७ अन्वये दि २२ ऑगस्ट २०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती कंधार पोलीस ठाण्याचे ठाणे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ए.एस नरंगले यांनी दिली.
या कारवाईसाठी लाच लुचपत प्रतिबंधक नांदेड विभागाचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे व अप्पर पोलीस अधीक्षक डॉ.अश्विनी जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अर्चना करपूडे यांच्यासह पोहेका मेनका पवार, यशवंत दाबनवाड, पोका ईश्वर जाधव, सय्यद खदिर, शिवानंद रापतवार व चालक पोहेका गजानन राऊत, रमेश नामपल्ले या एसीबी पथकाने कारवाई केली. आरोपीला अद्याप ताब्यात घेण्यात आलेले नाही. या कार्यवाहीमुळे कंधार तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
