भोकर न्यायालयात वकिलाला मारहाण; हिमायतनगर वकिल संघ आक्रमक

न्यायालयाच्या आवारातच वकिलाला शिवीगाळ, मारहाण अन् जीवे मारण्याची धमकी; आरोपींवर कडक कारवाईची मागणी, अन्यथा आंदोलनाचा इशारा

हिमायतनगर, प्रतिनिधी| न्यायालयाच्या पवित्र परिसरातच वकिलाला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या कथित प्रकारामुळे कायदा क्षेत्रात संतापाची लाट उसळली आहे. भोकर न्यायालयात केसकामी गेलेल्या अधिवक्ता विनोद रेड्डी यांना एका आरोपीने अश्लील शिवीगाळ करून मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. या घटनेचा हिमायतनगर अधिवक्ता संघाने तीव्र निषेध नोंदवत दोषींवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

या घटनेच्या निषेधार्थ दि. २० ऑगस्ट २०२६ रोजी हिमायतनगर अधिवक्ता संघाची तातडीची बैठक अध्यक्ष अ‍ॅड. अतुल वानखेडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. बैठकीत घटनेचा एकमताने निषेध ठराव मंजूर करण्यात आला.

न्यायालयातच वकील असुरक्षित असेल तर सामान्य नागरिकांच्या न्यायाची हमी कोण देणार? असा सवाल उपस्थित करत वकिलांनी या घटनेकडे गांभीर्याने पाहण्याची मागणी केली. न्यायालय परिसरात कायद्याचे रक्षण करणाऱ्या वकिलावर हल्ला होणे ही केवळ व्यक्तीवरील मारहाण नसून न्यायव्यवस्थेच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी बाब असल्याचे संघाने म्हटले आहे.

वकिल संघाच्या ठरावात, संबंधित आरोपींविरुद्ध तातडीने कठोर कायदेशीर कारवाई करावी, तसेच न्यायालय परिसरात वकिलांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली. दोषींवर वेळेत कारवाई न झाल्यास आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्याचा इशाराही संघाने दिला आहे.

या घटनेमुळे भोकर न्यायालय परिसरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, न्यायालयीन कामकाजासाठी येणाऱ्या वकिलांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्याची जबाबदारी प्रशासनाची असल्याचे अधिवक्त्यांनी स्पष्ट केले.

बैठकीस अधिवक्ता संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. अतुल वानखेडे, उपाध्यक्ष किरणकुमार गुंडाळे, अ‍ॅड. श्रीराम शिंदे, अ‍ॅड. दिलीप राठोड, अ‍ॅड. आर. एस. जाधव, अ‍ॅड. नवीनकुमार ठाकूर, अ‍ॅड. अरविंद सोळंके, अ‍ॅड. कानबाराव पोपलवार, अ‍ॅड. पांडुरंग गाडगे, अ‍ॅड. ज्ञानेश्वर पंदलवाड, अ‍ॅड. संदेश कोठकर, अ‍ॅड. हरीचंद्र गायकवाड, अ‍ॅड. विजय रचेवार यांच्यासह अनेक अधिवक्ते उपस्थित होते. आरोपींवर तातडीने कठोर कारवाई झाली नाही, तर आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आल्याने आता प्रशासन या प्रकरणी काय भूमिका घेते, याकडे कायदे क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!