प्रवाशांना अडचणीच्या वेळी दिली तत्पर मदत; सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्यांकडूनही कौतुक

नांदेड| प्रवाशांना केवळ त्यांच्या गंतव्यस्थानी पोहोचविणे एवढेच नव्हे, तर अडचणीच्या प्रसंगी माणुसकीच्या भावनेतून मदतीचा हात पुढे करणे, हेही महाराष्ट्राच्या एसटी सेवेचे वैशिष्ट्य आहे. याची प्रचिती शुक्रवारी सकाळी नांदेड–देगलूर मार्गावर आली. ट्रॅव्हल्स बस खराब झाल्यामुळे रस्त्यावर ताटकळत उभ्या असलेल्या पंजाबमधील सुमारे ३० महिला प्रवाशांना ‘शिवाई’ बसच्या चालक, वाहक आणि वाहतूक नियंत्रकांनी तत्परतेने मदत करून सुखद अनुभव दिला.

शुक्रवार, २१ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास पंजाब येथील सुमारे ३० महिला प्रवासी प्रवास करत असलेल्या ट्रॅव्हल्समध्ये अचानक बिघाड झाला. वाहन रस्त्यातच बंद पडल्याने महिला प्रवाशांना बराच वेळ अडचणींचा सामना करावा लागत होता. अनोळखी ठिकाणी, वाहनाची सुविधा उपलब्ध नसल्याने त्यांच्या चिंतेत भर पडली होती.

याचवेळी नांदेड–देगलूर मार्गावर धावणाऱ्या ‘शिवाई’ बसचे चालक राजेंद्र गवलवाड आणि वाहक मारुती सोनकांबळे यांच्या निदर्शनास ही बाब आली. त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून महिला प्रवाशांना आवश्यक ती मदत केली. वाहतूक नियंत्रक एन. बी. घाटोळ यांनीही समन्वय साधत प्रवाशांना योग्य सेवा मिळण्यासाठी तत्परता दाखवली.

परराज्यातून आलेल्या या महिला प्रवाशांना अडचणीच्या काळात मिळालेली ही मदत त्यांच्या विशेष लक्षात राहिली. प्रवासादरम्यान अनोळखी व्यक्तींनी दाखविलेली आपुलकी, सहकार्य आणि सौजन्य पाहून पंजाबच्या महिला प्रवाशांनी आनंद व्यक्त केला. महाराष्ट्राची ‘अतिथी देवो भव’ची भावना, माणुसकी, सौजन्य आणि सहकार्याची संस्कृती या प्रसंगातून अनुभवायला मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सीमावर्ती भागाचे प्रमुख समन्वयक श्री गोविंद मुंडकर,सेवानिवृत्त पोलीस अधिकारी श्री. बालाजी गाजेवार यांनी परिवहन महामंडळाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. एसटी कर्मचारी हे केवळ वाहन चालविण्याचे किंवा प्रवाशांची तिकिटे देण्याचे काम करत नाहीत, तर गरजेच्या वेळी प्रवाशांच्या मदतीला धावून जाण्याची सामाजिक बांधिलकीही जपतात, हे या घटनेतून सुस्पष्ट झाल्याचे त्यांनी नमूद केले.

परराज्यातील प्रवाशांना संकटाच्या वेळी दिलेल्या या मदतीमुळे नांदेडचीच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राची माणुसकीची प्रतिमा उजळली आहे. प्रवाशांच्या चेहऱ्यावरचा दिलासा आणि त्यांच्या मनातील कृतज्ञता हीच या कर्मचाऱ्यांच्या तत्पर सेवेची खरी पावती ठरली.

अडचणीत सापडलेल्या प्रवाशांना मदतीचा हात देणारे राजेंद्र गवलवाड, मारुती सोनकांबळे आणि एन. बी. घाटोळ यांचे कार्य निश्चितच कौतुकास्पद असून, ‘प्रवासी सेवा हीच खरी सेवा’ या भावनेचा त्यांनी आदर्श घालून दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!