
रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता? लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतप्त; तातडीने दुरुस्तीची मागणी
हिमायतनगर,उत्कर्ष मादसवार| हिमायतनगर तालुक्यातील खडकी फाटा ते खडकी बाजार गावापर्यंतच्या राष्ट्रीय महामार्गाची अक्षरशः दुरवस्था झाली असून, रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता, असा प्रश्न वाहनधारकांना पडला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या मार्गाकडे दुर्लक्ष झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.


या मार्गावर मोठमोठे खड्डे पडल्याने दुचाकीस्वारांना अक्षरशः तारेवरची कसरत करत प्रवास करावा लागत आहे. रात्रीच्या वेळी तर खड्ड्यांचा अंदाज न आल्याने अपघाताचा धोका अधिकच वाढला आहे. शेतकरी, विद्यार्थी, कामगार तसेच दररोज या मार्गावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना या खराब रस्त्याचा मोठा फटका बसत आहे.


रस्ता दुरुस्तीअभावी वाहनांचे नुकसान होत असून, नागरिकांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया जात आहेत. पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने परिस्थिती आणखी गंभीर होत आहे. त्यामुळे एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.


दरम्यान, या रस्त्याच्या दुरवस्थेकडे लोकप्रतिनिधींचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामीण भागातील नागरिकांनी केला आहे. केवळ आश्वासनांवर वेळ मारून न नेता संबंधित विभागाने प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.


गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या या रस्त्याची तातडीने पाहणी करून दर्जेदार पद्धतीने दुरुस्ती करावी. शेतकरी, विद्यार्थी, वाहनधारक आणि सर्वसामान्य नागरिकांचा सुरक्षित प्रवास सुनिश्चित करावा, अन्यथा नागरिकांच्या रोषाला प्रशासनाला सामोरे जावे लागेल, असा इशारा स्थानिकांकडून दिला जात आहे. “अपघात होण्याची वाट पाहू नका; आधी रस्ता दुरुस्त करा!” अशी संतप्त मागणी नागरिकांतून होत आहे.
