देगलूरातील एकमेव आधार केंद्र चार महिन्यांपासून बंद; नागरिकांची हेळसांड

आधार केंद्र तातडीने सुरू करण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाचा पोस्ट कार्यालयाला घेराव; कुलूप ठोकून आंदोलनाचा इशारा

देगलूर, प्रतिनिधी| देगलूर तालुक्यातील पोस्ट कार्यालयात सुरू असलेले एकमेव आधार नोंदणी केंद्र मागील चार महिन्यांपासून बंद असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. आधार कार्ड नोंदणी व दुरुस्तीअभावी शैक्षणिक तसेच विविध शासकीय कामे खोळंबत असल्याने हे केंद्र तातडीने सुरू करावे, या मागणीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी देगलूर पोस्ट कार्यालयाला घेराव घातला.

यावेळी पोस्ट ऑफिसर पवार यांना निवेदन देत नांदेडच्या मुख्य पोस्ट ऑफिसर कुलकर्णी यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधण्यात आला. आधार केंद्र तातडीने सुरू न केल्यास पोस्ट कार्यालयाला कुलूप ठोकून तीव्र निदर्शने व धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेना पदाधिकाऱ्यांनी दिला.

देगलूर हे तेलंगणा, कर्नाटक व आंध्र प्रदेशाच्या सीमावर्ती भागाला जोडलेले महत्त्वाचे ठिकाण आहे. त्यामुळे देगलूर पोस्ट कार्यालयातील आधार केंद्रावर या परिसरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत होती. शैक्षणिक प्रवेश, शासकीय योजना, विविध कागदपत्रांची पूर्तता तसेच इतर आवश्यक कामांसाठी आधार नोंदणी व दुरुस्ती करणे नागरिकांसाठी अत्यावश्यक आहे.

आधार केंद्र सुरू असताना महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिक तसेच लहान बालकांना पहाटेपासून रांगेत उभे राहावे लागत होते. अनेक नागरिक आपली कामे बाजूला ठेवून सकाळी पाच वाजल्यापासून केंद्राबाहेर प्रतीक्षा करत होते. मात्र, आता हे एकमेव केंद्रच चार महिन्यांपासून बंद असल्याने नागरिकांना आधारसंबंधी कामांसाठी इतर ठिकाणी धाव घ्यावी लागत आहे. त्यामुळे वेळ आणि पैशांचा मोठा अपव्यय होत असून नागरिकांमध्ये नाराजी आहे.

या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत पोस्ट ऑफिसर पवार यांना घेराव घातला. तसेच नांदेडचे मुख्य पोस्ट ऑफिसर कुलकर्णी यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून आधार केंद्र तातडीने सुरू करण्याची मागणी करण्यात आली.

यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश पाटील, देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघ प्रमुख पांडुरंग पाटील थडके देगावकर, देगलूर शहरप्रमुख भगवान जाधव, शिवाजी सोनकांबळे मुजळगेकर, हणमंत देशमुख ढोसणीकर, खानापूरकर केरले यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. आधार केंद्र बंद असल्याने नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेता प्रशासनाने तातडीने दखल घेऊन केंद्र सुरू करावे, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा शिवसेना पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!