
निकृष्ट कामाचा आरोप; चौकशी पूर्ण होईपर्यंत कंत्राटदाराचे अंतिम देयक रोखण्याची मागणी
हदगाव | हदगाव नगरपरिषदेच्या अंतर्गत आठवडी बाजारातील मारोती मंदिर परिसरात करण्यात आलेल्या सी.सी. रस्त्याच्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. या कामाची स्वतंत्र व निष्पक्ष तांत्रिक चौकशी करून वस्तुस्थिती समोर आणावी, अशी मागणी श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे हदगाव शहरप्रमुख अतुल काळे यांनी केली आहे.



याबाबत काळे यांनी हदगाव नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. संबंधित रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप करत प्रत्यक्ष स्थळ पाहणी, मोजमाप आणि बांधकामाच्या गुणवत्तेची तांत्रिक तपासणी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.



एम.बी.मधील नोंदीशी प्रत्यक्ष मोजमापाची पडताळणी करा
तक्रारीत रस्त्याची लांबी, रुंदी आणि जाडी प्रत्यक्ष मोजून ती Measurement Book (M.B.) मधील नोंदीशी पडताळून पाहावी, अशी मागणी करण्यात आली आहे. त्याचबरोबर मंजूर अंदाजपत्रक, तांत्रिक मान्यता, Work Order, करारनामा, बिल तसेच संबंधित सर्व अभिलेखांची तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. रस्त्याच्या बांधकामाच्या गुणवत्तेबाबत शंका असल्याने आवश्यक असल्यास काँक्रीट तसेच वापरण्यात आलेल्या बांधकाम साहित्याचे नमुने अधिकृत प्रयोगशाळेत पाठवून गुणवत्ता तपासणी करावी, असेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.


चौकशी होईपर्यंत अंतिम बिल रोखण्याची मागणी
संपूर्ण चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित कंत्राटदाराचे अंतिम बिल अथवा कोणतेही अंतिम देयक अदा करू नये, अशी स्पष्ट मागणी अतुल काळे यांनी केली आहे. याशिवाय संबंधित कंत्राटदार हा नगरपरिषदेतील कोणत्याही नगरसेवकाचा नातेवाईक आहे का, काम मिळवून देण्यासाठी कोणाची शिफारस करण्यात आली होती का, तसेच या कामाबाबत यापूर्वी नगरपरिषदेकडे कोणतीही तक्रार प्राप्त झाली होती का, याचीही चौकशी करून संबंधित माहिती सार्वजनिक करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.


अनियमितता आढळल्यास नुकसानभरपाई वसूल करा
तांत्रिक चौकशीत कामामध्ये अनियमितता किंवा निकृष्ट दर्जा आढळून आल्यास संबंधित कंत्राटदारावर नियमानुसार कठोर कारवाई करावी. तसेच नगरपरिषदेच्या निधीचे नुकसान झाल्याचे निष्पन्न झाल्यास संबंधितांकडून नुकसानभरपाई वसूल करावी, अशी मागणी तक्रारीत करण्यात आली आहे. नगरपरिषद प्रशासनाने तक्रारीची दखल घेतली नाही किंवा चौकशीकडे दुर्लक्ष केले तर श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही शहरप्रमुख अतुल काळे यांनी दिला आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रारीच्या प्रती
या तक्रारीच्या प्रती जिल्हाधिकारी, नांदेड; नगरपालिका प्रशासन अधिकारी; कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, नांदेड; उपविभागीय अधिकारी व तहसीलदार, हदगाव, तसेच हदगाव नगरपरिषदेतील संबंधित अभियंता आणि बांधकाम विभागाकडे देण्यात आल्या आहेत.

आता नगरपरिषद प्रशासन या गंभीर आरोपांची दखल घेऊन प्रत्यक्ष तांत्रिक तपासणी करते का आणि दोष आढळल्यास कोणती कारवाई करते, याकडे हदगाव शहरवासीयांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, तक्रारीतील आरोपांची अधिकृत चौकशी होणे बाकी असून, संबंधित कंत्राटदार अथवा नगरपरिषद प्रशासनाची बाजू उपलब्ध झाल्यास तीही प्रसिद्ध करण्यात येईल.
