वॉर्ड क्रमांक १७ मधील रस्ता व नाल्यांच्या दुरवस्थेकडे नगरपंचायतीचे दुर्लक्ष – माजी नगरसेविका सौ. सुरेखा सातव

रेल्वे स्थानक रस्त्यावर अपघाताचा धोका वाढल्याने तातडीने दुरुस्ती व नालेसफाईची मागणी

हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार| हिमायतनगर नगरपंचायत हद्दीतील वॉर्ड क्रमांक १७ मधील रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून, रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. पावसामुळे या खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या गंभीर समस्येकडे नगरपंचायत प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी माजी नगरसेविका सौ. सुरेखा सदाशिवराव सातव यांनी केली आहे.

याबाबत त्यांनी हिमायतनगर नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. निवेदनात वॉर्ड क्रमांक १७ मधील रेल्वे स्टेशनकडे जाणारा मुख्य रस्ता अत्यंत खराब झाला असून, नागरिकांना ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे नमूद केले आहे.

पावसामुळे रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये पाणी साचत आहे. त्यातच नाल्यांची योग्य वेळी व नियमित साफसफाई होत नसल्याने नाल्यांमधील पाणी आणि सांडपाणी रस्त्यावर साचत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. नाल्यांमध्ये गवत व झाडेझुडपे वाढल्याने पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाही. परिणामी नागरिकांच्या घरांमध्येही अस्वच्छता व दुर्गंधीचे वातावरण निर्माण होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

अपघाताचा धोका; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण – रस्त्याची दुरवस्था आणि पाणी साचल्यामुळे शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक तसेच वाहनचालकांना दररोज अडचणींचा सामना करावा लागत आहे. पावसाळ्यात चिखल, दुर्गंधी आणि डासांचा प्रादुर्भाव वाढून साथीच्या आजारांचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. खराब रस्त्यामुळे अपघात होण्याची शक्यताही वाढली असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

रेल्वे स्टेशनकडे जाणारा हा प्रमुख रस्ता असल्याने या मार्गावर नागरिकांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे रस्त्याची तातडीने पाहणी करून कायमस्वरूपी दुरुस्ती करणे तसेच नाल्यांची स्वच्छता करणे गरजेचे असल्याचे सौ. सातव यांनी म्हटले आहे.

पाहणी करून तातडीने कार्यवाहीची मागणी – वॉर्ड क्रमांक १७ ची प्रत्यक्ष पाहणी करून रस्त्याची कायमस्वरूपी दुरुस्ती करावी आणि नाल्यांची स्वच्छता करण्यासाठी संबंधित विभागाला तातडीने आदेश द्यावेत, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. या अर्जाची तातडीने दखल घेऊन लवकरात लवकर कार्यवाही करावी, अन्यथा नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागू शकते, अशी भूमिका सौ. सुरेखा सदाशिवराव सातव यांनी मांडली आहे.

“रस्त्याची दुरवस्था आणि नाल्यांच्या अस्वच्छतेमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रशासनाने केवळ कागदोपत्री कार्यवाही न करता प्रत्यक्ष पाहणी करून समस्या कायमस्वरूपी सोडवावी,” अशी मागणी त्यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!