
२२ हजारांहून अधिक अवशिष्ट क्लोरीन तपासण्या; एकाही पाणी नमुन्यात असमाधानकारक गुणवत्ता आढळली नाही
नांदेड | प्रवासी आणि रेल्वे कर्मचाऱ्यांना सुरक्षित व स्वच्छ पिण्याचे पाणी तसेच स्वच्छतापूर्ण खाद्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाकडून पाणी गुणवत्ता तपासणीची यंत्रणा अधिक सक्षम करण्यात आली आहे. कॅग अहवालातील निरीक्षणांमध्ये नांदेड विभागातील कोणत्याही रेल्वे स्थानकावर दूषित पाणी आढळल्याचे नमूद नसल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.



नांदेड विभागातील विविध रेल्वे स्थानके आणि रेल्वे वसाहतींमध्ये ९ आरोग्य निरीक्षकांचे समर्पित पथक कार्यरत असून, रेल्वे वैद्यकीय विभागाच्या मार्गदर्शनाखाली पाणी गुणवत्ता आणि खाद्यपदार्थांच्या स्वच्छतेची नियमित पाहणी केली जाते.



सात महिन्यांत हजारो नमुन्यांची तपासणी – पाणी गुणवत्तेच्या नियमित निरीक्षणाअंतर्गत पाण्याचे नमुने घेऊन जैविक परीक्षण, अवशिष्ट क्लोरीन तपासणी आणि रासायनिक विश्लेषण केले जाते. गेल्या सात महिन्यांत विभागाकडून—
- १,०२९ पाण्याच्या नमुन्यांची जैविक तपासणी
- २२,३६५ नमुन्यांची अवशिष्ट क्लोरीन तपासणी
- ११२ नमुन्यांचे रासायनिक विश्लेषण
- ९१ खाद्यपदार्थांच्या नमुन्यांची गुणवत्ता तपासणी करण्यात आली आहे.
रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार, या कालावधीत तपासण्यात आलेल्या एकाही पाण्याच्या नमुन्यात असमाधानकारक गुणवत्ता आढळून आलेली नाही. त्यामुळे पाणी गुणवत्तेवर सातत्याने ठेवण्यात येणारी देखरेख आणि नियंत्रण व्यवस्था प्रभावीपणे कार्यरत असल्याचे विभागाने म्हटले आहे.


कॅन्टीन व पॅन्ट्रीवरही विशेष लक्ष – रेल्वे स्थानकांवरील कॅन्टीन, पॅन्ट्री कार आणि खाद्यपदार्थ विक्री केंद्रांमधून पॅकबंद खाद्यपदार्थांसह कच्च्या मालाचे आणि तयार खाद्यपदार्थांचे नमुनेही वेळोवेळी घेण्यात येतात. हे नमुने निर्धारित प्रयोगशाळांमध्ये तपासणीसाठी पाठविले जातात. खाद्यपदार्थांची गुणवत्ता, कच्च्या मालाची स्वच्छता, खाद्यपदार्थ हाताळण्याच्या पद्धती आणि परिसरातील स्वच्छतेची नियमित पाहणी करण्यात येत असल्याचे रेल्वे विभागाने स्पष्ट केले आहे.
तपासणी यंत्रणेला आणखी बळकटी – कॅग अहवालातील निरीक्षणांच्या पार्श्वभूमीवर नांदेड विभागाने पाणी व खाद्यपदार्थांच्या गुणवत्ता तपासणी यंत्रणेला आणखी बळकटी दिली आहे. आरोग्य अधिकाऱ्यांना नियमित नमुने संकलित करण्याचे वेळापत्रक काटेकोरपणे पाळणे, नमुने निर्धारित प्रयोगशाळांमध्ये वेळेत पाठविणे आणि रेल्वे परिसरातील पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेवर बारकाईने लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

आरोग्य निरीक्षक आणि मुख्य आरोग्य निरीक्षकांकडून रेल्वे स्थानके व वसाहतींमध्ये नियमित तपासणी केली जात असल्याने ही व्यवस्था केवळ विशेष मोहिमांपुरती मर्यादित नसून सातत्याने सुरू असल्याचे विभागाने नमूद केले आहे.


प्रवाशांना सुरक्षित पिण्याचे पाणी, स्वच्छतापूर्ण खाद्यपदार्थ आणि आरोग्यदायी वातावरण उपलब्ध करून देण्यास नांदेड विभाग कटिबद्ध असून, स्वच्छता, आरोग्य आणि सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत असल्याचे दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने स्पष्ट केले आहे.
