उंचाडा येथील ज्येष्ठ शेतकरी बाबुराव पाटील चव्हाण यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन

ज्येष्ठ निष्ठावंत शिवसैनिक काळाच्या पडद्याआड; गावात शोककळा

हदगाव, प्रतिनिधी| हदगाव तालुक्यातील मौजे उंचाडा येथील ज्येष्ठ शेतकरी तथा प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व बाबुराव चिमणाजी पाटील चव्हाण (वय ७७) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. नांदेड येथील भगवती हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल असताना दि. ११ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजून १० मिनिटांनी त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली.

बाबुराव पाटील चव्हाण हे उंचाडा परिसरातील प्रतिष्ठित आणि सामाजिक जाणीव असलेले व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित होते. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच उंचाडा गावावर शोककळा पसरली. त्यांच्या पार्थिवावर उंचाडा येथील त्यांच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी परिसरातील विविध क्षेत्रांतील मान्यवर, नातेवाईक, मित्रपरिवार व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

निष्ठावंत शिवसैनिक म्हणून ओळख बाबुराव पाटील चव्हाण यांनी सुरुवातीपासून शिवसेना पक्षात सक्रियपणे कार्य केले. शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित असलेले ते निष्ठावंत ज्येष्ठ शिवसैनिक म्हणून परिसरात परिचित होते. पक्षाच्या विचारांशी आयुष्यभर त्यांनी निष्ठा कायम ठेवली.

त्यांच्या कार्यकाळात हदगाव तालुक्यातील उंचाडा येथे शिवसेनेची पहिली शाखा स्थापन करण्यात आली, अशी आठवण त्यांच्या सहकाऱ्यांकडून सांगण्यात येते. संघटन कौशल्य, शिस्तप्रिय स्वभाव आणि गरजूंच्या मदतीसाठी सदैव तत्पर राहण्याची वृत्ती ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये होती.

काही महिन्यांपासून त्यांना किडनी स्टोनचा त्रास होता. त्यावर शस्त्रक्रिया करण्यासाठी त्यांना नांदेड येथील भगवती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, शस्त्रक्रियेपूर्वीच हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, भाऊ-बहीण, मुले, मुली, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाने कुटुंबीयांसह उंचाडा व परिसरातील नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!