
बोधीवृक्षाचे रोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश; श्रामणेर प्रशिक्षण केंद्र देशपातळीवर विकसित करण्याचा विश्वास
नांदेड,प्रतिनिधी| खुरगाव येथील श्रामणेर प्रशिक्षण केंद्राला सुजात आंबेडकर यांनी सदिच्छा भेट दिली. त्यांच्या आगमनाने परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी भदन्त पय्याबोधी थेरी यांच्या उपस्थितीत सुजात आंबेडकर यांच्या हस्ते बोधीवृक्षाचे रोपण करण्यात आले. बोधीवृक्षाच्या रोपणातून पर्यावरण संवर्धनासोबतच धम्म आणि निसर्ग यांच्यातील अतूट नाते जपण्याचा संदेश देण्यात आला.



यावेळी सुजात आंबेडकर यांनी विहाराची तसेच श्रामणेर प्रशिक्षण केंद्राच्या परिसराची पाहणी केली. उपासक-उपासिकांसाठी विहाराची सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी भदन्त पय्याबोधी थेरी यांचे अभिनंदन केले. विहाराच्या उद्घाटनापूर्वीच शुभेच्छा देताना, या पवित्र स्थळी उभारण्यात येत असलेले कार्य समाजासाठी प्रेरणादायी ठरेल, असे त्यांनी सांगितले.



खुरगावच्या ऐतिहासिक भूमीत उभारण्यात येत असलेले श्रामणेर प्रशिक्षण केंद्र भविष्यात केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित न राहता देशपातळीवर विकसित व्हावे, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली. देशाच्या विविध भागांतून भिक्षू येथे प्रशिक्षण घेऊन धम्माच्या प्रसारासाठी कार्यरत होतील, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला.


समता आणि मानवतेच्या विचारांचा जागर – समाजपरिवर्तनाचे कार्य हे तथागत गौतम बुद्ध, बोधिसत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज, अण्णाभाऊ साठे, बसवेश्वर महाराज तसेच संत-महापुरुषांच्या समतावादी व मानवतावादी विचारधारेतून प्रेरणा घेऊन पुढे नेले पाहिजे. समाजाच्या उन्नतीसाठी या विचारधारेतून कार्य करणे हीच खरी समाजसेवा असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर, अंजली आंबेडकर आणि सुजात आंबेडकर यांचे सामाजिक कार्यही महापुरुषांच्या विचारधारेवर आधारित असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. सामाजिक समता, बंधुता आणि वंचित घटकांच्या हक्कांसाठी सुरू असलेल्या या विचारप्रवाहाला भविष्यात व्यापक जनसमर्थन मिळेल, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.


यावेळी वंचित बहुजन आघाडीला भविष्यात सत्तेची संधी मिळावी तसेच सुजात आंबेडकर यांनी देशाचे नेतृत्व करावे, अशा राजकीय अपेक्षाही व्यक्त करण्यात आल्या. एकूणच, खुरगावच्या ऐतिहासिक भूमीत आकार घेत असलेले श्रामणेर प्रशिक्षण केंद्र भविष्यात धम्म, समता, बंधुता, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक परिवर्तनाचे देशव्यापी केंद्र म्हणून विकसित होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
