श्री परमेश्वर मंदिरात श्रावण मास उत्सवाला शुक्रवारपासून शानदार सुरुवात

महिनाभर विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल; तीन संगीतमय कथा महोत्सवांचे आयोजन

हिमायतनगर,अनिल मादसवार | हिमायतनगर तालुक्यातील वाढोणा येथील जागृत व पुरातन श्री परमेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट कमिटीच्या वतीने पवित्र श्रावण मासानिमित्त महिनाभर विविध भव्य धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार, दि. १४ ऑगस्टपासून मंदिर परिसरात धार्मिक कार्यक्रमांना शानदार सुरुवात होणार असून सलग तीन संगीतमय कथा महोत्सवांचे आयोजन करण्यात आले आहे.

हिंदू पंचांगानुसार दि. १३ ऑगस्ट २०२६ रोजी गुरुवारपासून श्रावण मासाला सुरुवात झाली. श्रावण महिन्याच्या पहिल्याच दिवशी श्री परमेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांनी सकाळपासून मोठी गर्दी केली होती. महिनाभर चालणाऱ्या या धार्मिक उत्सवामुळे वाढोणा नगरीत भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.

देवस्थान समितीचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारपासून संगीतमय श्रीमद् भागवत कथा महोत्सवाला सुरुवात होणार आहे. प्रसिद्ध भागवताचार्य ह.भ.प. सुश्री स्नेहाताई (माई) आठवलेकर यांच्या सुमधुर वाणीतून दि. १४ ते २० ऑगस्ट २०२६ दरम्यान दररोज दुपारी २ ते सायंकाळी ५ या वेळेत कथा होणार आहे. दि. २१ ऑगस्ट रोजी काल्याच्या कीर्तनाने या कथा महोत्सवाची सांगता होईल. कथा सोहळ्यात श्रीकृष्णाच्या विविध लीलांचे वर्णन तसेच आकर्षक झाकीच्या माध्यमातून भगवंताचे दर्शन भाविकांना घडणार आहे.

यानंतर दि. २३ ते २९ ऑगस्ट २०२६ दरम्यान दुसऱ्या सप्ताहात संगीतमय श्री संतचरित्र कथा आयोजित करण्यात आली आहे. ह.भ.प. संतोष महाराज पवार संकुलकर (श्रीधाम कुंथलगिरी) यांच्या रसाळ वाणीतून दररोज दुपारी २ ते सायंकाळी ५ या वेळेत संतचरित्र कथा होणार आहे. दि. ३० ऑगस्ट रोजी काल्याच्या कीर्तनाने या कथा महोत्सवाची सांगता होईल. विविध संतांचे जीवनचरित्र आणि त्यांच्या कार्याची माहिती झाकीच्या माध्यमातून भाविकांना अनुभवता येणार आहे.

श्रावण मासाच्या तिसऱ्या व अंतिम सप्ताहात संगीतमय श्री शिवमहापुराण कथा आयोजित करण्यात आली आहे. प.पू. श्री हेमंतजी महाराज शास्त्री (जगतगुरु) यांच्या मुखारविंदातून दि. १ ते ७ सप्टेंबर २०२६ दरम्यान दररोज दुपारी २ ते सायंकाळी ५ या वेळेत शिवमहापुराण कथा होणार आहे. दि. ८ सप्टेंबर रोजी काल्याचे कीर्तन होऊन श्रावण मास कथा सोहळ्याची सांगता करण्यात येणार आहे. यानिमित्ताने भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून भगवान श्री महादेवाच्या विविध लीलांचे व महात्म्याचे निरूपण झाकीसह करण्यात येणार आहे.

भाविकांसाठी विशेष व्यवस्था – कथा समाप्तीनंतर दररोज भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली असून, दानशूर भाविकांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. श्रावण मास उत्सवानिमित्त मंदिर परिसराची स्वच्छता, आकर्षक विद्युत रोषणाई, भगवे ध्वज, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच भाविकांच्या दर्शनासाठी स्वतंत्र व विशेष रांगेचे नियोजन करण्यात आले आहे.

श्रावण मासातील या पवित्र धार्मिक कथा व कार्यक्रमांचा वाढोणा, हिमायतनगर तसेच पंचक्रोशीतील भाविक-भक्तांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थानच्या पदसिद्ध अध्यक्षा तथा तहसीलदार सौ. पल्लवी टेमकर, उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ, सचिव अनंता देवकते यांच्यासह सर्व संचालक मंडळ, पुजारी व ग्रामस्थ वाढोणा यांनी केले आहे. श्रावण मास उत्सवानिमित्त श्री परमेश्वर मंदिरात भक्ती, श्रद्धा आणि अध्यात्माचा त्रिवेणी संगम अनुभवायला मिळणार असून, महिनाभर चालणाऱ्या या धार्मिक सोहळ्याची भाविकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!