
सुदेशना पिंचा प्रथम; रुक्मा गायकवाड द्वितीय तर नंदिनी भगत तृतीय
हिमायतनगर, प्रतिनिधी| हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालयात भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त ‘वाचन संस्कृती जोपासणे’ या विषयावर वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत १३ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत वाचन संस्कृतीचे महत्त्व विविध पैलूंतून मांडले.



कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. उज्ज्वला सदावर्ते होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ. सूर्यप्रकाश जाधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाचे ग्रंथपाल राजू बोंबले यांनी केले.



प्रास्ताविकातून ग्रंथपाल राजू बोंबले यांनी डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या जीवनकार्याचा आढावा घेत वाचन संस्कृतीचे महत्त्व स्पष्ट केले. प्रमुख पाहुणे प्रा. डॉ. सूर्यप्रकाश जाधव यांनी डिजिटल युगात वाचनाची गरज अधोरेखित केली. समाजसुधारक आणि क्रांतिकारकांनी वाचनाच्या माध्यमातून वैचारिक परिवर्तन घडवून आणल्याची विविध उदाहरणे त्यांनी दिली.


अध्यक्षीय भाषणात प्राचार्या डॉ. उज्ज्वला सदावर्ते यांनी “तरुण पिढीने मोबाईलच्या स्क्रीनवरून पुस्तकांच्या पानांकडे वळणे गरजेचे आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) माहिती देऊ शकते; मात्र मानवी भावना आणि वैचारिक प्रगती समृद्ध करण्याचे सामर्थ्य पुस्तकांच्या वाचनात आहे,” असे प्रतिपादन केले. वक्तृत्व स्पर्धेत कु. सुदेशना त्रिलोकचंद पिंचा हिने प्रथम, कु. रुक्मा सुधाकर गायकवाड हिने द्वितीय, तर कु. नंदिनी राहुल भगत हिने तृतीय क्रमांक पटकावला. सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व ग्रंथ भेट देण्यात आली.


स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्रा. डॉ. वसंत कदम, प्रा. डॉ. शेख शहेनाज आणि प्रा. डॉ. संगपाल इंगळे यांनी काम पाहिले. यावेळी प्रा. डॉ. शेख शहेनाज यांच्या वतीने महाविद्यालयाच्या ग्रंथालयाला पुस्तके भेट देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. स्नेहा पवार व कु. अरुणा तोकलवाड यांनी केले, तर आभार कु. स्वाती रच्चेवार यांनी मानले. कार्यक्रमास प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
