कुस्तीच्या आखाड्यात नाव गाजवणाऱ्या सविताजी कोमलवाड यांचे आकस्मिक निधन

अवघ्या २२व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; दोन वर्षांचा मुलगा आणि चार महिन्यांच्या चिमुकलीवर मातृछत्र हरपले

हिमायतनगर, प्रतिनिधी| हिमायतनगर तालुक्यातील मुधळ येथील प्रसिद्ध महिला कुस्तीपटू सौ. सविताजी राम पाशमवार (कोमलवाड) यांचे अवघ्या २२व्या वर्षी आकस्मिक निधन झाले. त्यांच्या निधनाने गोल्ला-गोलेवार यादव समाजासह क्रीडा क्षेत्रावर शोककळा पसरली असून, परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

सविताजी यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेत असतानाच कुस्तीच्या आखाड्यात पाऊल ठेवले होते. जिद्द, मेहनत आणि कर्तृत्वाच्या जोरावर त्यांनी महिला कुस्तीपटू म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. ग्रामीण भागातून पुढे येत त्यांनी कुस्ती क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली होती.

मुधळ येथील सविताजी यांचे माहेर शिबदरा येथील दत्ता कोमलवाड यांच्या कुटुंबात होते. अत्यंत कमी वयात त्यांनी संसारासोबतच क्रीडा क्षेत्रातही आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. त्यांच्या आकस्मिक निधनाच्या वृत्ताने नातेवाईक, मित्रपरिवार आणि कुस्तीप्रेमींना मोठा धक्का बसला आहे.

सविताजी यांच्या पश्चात पती, अवघ्या दोन वर्षांचा मुलगा आणि केवळ चार महिन्यांची मुलगी असा परिवार आहे. आईचे छत्र हरपल्याने या चिमुकल्या मुलांवर मोठे दुःख कोसळले असून, या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसरातील नागरिक हळहळ व्यक्त करीत आहेत. त्यांच्या निधनाने एका होतकरू महिला कुस्तीपटूची अकाली एक्झिट झाली असून, क्रीडा क्षेत्राचीही मोठी हानी झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!