
हदगाव, गौतम वाठोरे| हदगाव-हिमायतनगर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार बाबूराव कदम कोहोळीकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर मोठे यश मिळाले असून, हदगाव येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय स्थापन करण्यास राज्य मंत्रिमंडळाने ११ ऑगस्ट २०२६ रोजी अंतिम मंजुरी दिली आहे.



या निर्णयामुळे हदगाव तालुक्यातील पक्षकार, वकील आणि नागरिकांना कायदेशीर कामांसाठी नांदेड येथे जाण्याची आवश्यकता राहणार नाही. परिणामी, वकिलांसह पक्षकारांचा वेळ, प्रवासाचा खर्च आणि आर्थिक भुर्दंडात मोठी बचत होणार असून नागरिकांची होणारी गैरसोय दूर होणार आहे.



आंदालनाचा/पाठपुराव्याचा प्रवास
या महत्त्वाच्या न्यायालयासाठी आमदार बाबूराव कदम कोहोळीकर यांनी स्थानिक वकील संघटनेच्या सहकार्याने विधी व न्याय विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. शासनाने न्यायालयासोबतच सरकारी वकील कार्यालयासाठी आवश्यक न्यायिक अधिकारी, कर्मचारी पदनिर्मिती तसेच खर्चाच्या तरतुदीलाही मान्यता दिली आहे.


या पक्षकार व वकिलांना वेळ, प्रवासखर्च व आर्थिक भुर्दंडात मोठी बचत. न्यायासाठी नांदेडला जाण्याची गरज नाही. प्रकरणांचा निपटारा गतीने होण्यास मदत. नागरिकांना वेळेवर न्याय मिळण्याची सुविधा. तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम होणार. या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे हदगाव तालुक्यात उत्साहाचे व आनंदाचे वातावरण असून, स्थानिक वकील संघटना आणि नागरिकांनी तीव्र समाधान व्यक्त केले आहे. तसेच या ऐतिहासिक निर्णयाबद्दल आमदार बाबूराव कदम कोहोळीकर यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.


