
दर्शन, वाहतूक, पार्किंग, स्वच्छता व सुरक्षेच्या सुविधांचा तहसीलदार पल्लवी टेमकर यांनी घेतला आढावा



हिमायतनगर, प्रतिनिधी | हिमायतनगर येथील जागृत देवस्थान श्री परमेश्वर मंदिरात श्रावण महिन्यानिमित्त दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होऊ नये, यासाठी सुलभ दर्शन व्यवस्था, वाहतूक नियोजन, स्वच्छता, सुरक्षा आणि इतर मूलभूत सुविधांचा आढावा घेण्यासाठी सोमवार, दि. ११ ऑगस्ट रोजी मंदिर समितीची आढावा बैठक घेण्यात आली.



श्री परमेश्वर मंदिर समितीच्या पदसिद्ध अध्यक्षा तथा तहसीलदार सौ. पल्लवी टेमकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस मंदिर समितीचे उपाध्यक्ष महावीरसेठ श्रीश्रीमाळ, सचिव अनंता देवकते, पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे, नगरपंचायत मुख्याधिकारी समाधान मासाळ, बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी श्री. दुबे यांच्यासह मंदिर समितीचे संचालक, विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.


यावेळी मंदिराचे संचालक प्रकाश शिंदे, प्रकाश कोमावार, मथुराबाई भोयर, लताताई मुलंगे, लताबाई पाध्ये, एड. दिलीप राठोड, अनिल मादसवार, संजय माने, विलास वानखेडे, गजानन मुत्तलवाड, मंदिराचे लिपिक बाबुराव भोयर गुरुजी, महावितरणचे परमेश्वर शिंदे, शिक्षण विभागाचे एम. जी. टेम्भूर्णीकर, नगरपंचायत विभागाचे विठ्ठल शिंदे, बालाजी हार्डपकर तसेच मंदिर समितीचे कर्मचारी उपस्थित होते.



श्रावण महिन्यात मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होत असल्याने दर्शन रांगेचे नियोजन, वाहतूक व पार्किंग व्यवस्था, मंदिर परिसरातील स्वच्छता, पिण्याचे पाणी, वीज व्यवस्था आणि सुरक्षा व्यवस्था याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. भाविकांना दर्शन घेताना कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे, अशा सूचना तहसीलदार सौ. पल्लवी टेमकर यांनी दिल्या.
हिमायतनगर येथील श्री परमेश्वर मंदिराला धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व असून, येथे हरिहराच्या रूपातील श्री परमेश्वराची उभी मूर्ती असल्याची श्रद्धा आहे. नवसाला पावणारा परमेश्वर म्हणून या देवस्थानाची सर्वदूर ख्याती आहे. त्यामुळे महाशिवरात्र तसेच श्रावण महिन्यात महाराष्ट्रासह विविध भागांतून भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात. श्रावण महिन्यातील धार्मिक उत्सव शांततेत, शिस्तबद्ध आणि भक्तिमय वातावरणात पार पडावा, यासाठी प्रशासन, मंदिर समिती, विविध विभाग, नागरिक आणि भाविकांनी सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार तथा मंदिर समितीच्या अध्यक्षा सौ. पल्लवी टेमकर यांनी केले.
