
विद्यार्थ्यांना देगलूर उपजिल्हा रुग्णालयात केलं दाखल
देगलूर, गंगाधर मठवाले | तालुक्यातील हाणेगाव येथील वसंतराव नाईक निवासी आश्रमशाळेतील ३२ विद्यार्थ्यांना भोजनानंतर विषबाधेसदृश त्रास झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विद्यार्थ्यांनी मांसाहारी भोजन केल्यानंतर अचानक उलट्या होण्यासह त्रास सुरू झाल्याने आश्रमशाळा प्रशासनाची धावपळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पालकांमध्येही चिंतेचे वातावरण निर्माण झाले.



त्रास झालेल्या विद्यार्थ्यांना तातडीने देगलूर येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. विद्यार्थ्यांना नेमक्या कोणत्या कारणामुळे त्रास झाला, भोजनातील कोणता पदार्थ कारणीभूत ठरला आणि भोजन तयार करताना स्वच्छता व सुरक्षिततेच्या कोणत्या उपाययोजना करण्यात आल्या होत्या, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.



भोजन व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह
निवासी आश्रमशाळेत राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भोजनाची जबाबदारी शाळा प्रशासनावर असते. विद्यार्थ्यांना स्वच्छ, सकस आणि पौष्टिक आहार मिळणे अपेक्षित असताना एकाच वेळी मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांना त्रास झाल्याने भोजनाची गुणवत्ता आणि स्वच्छतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.


विद्यार्थ्यांच्या आहारासाठी शासनाकडून निधी उपलब्ध करून दिला जातो. मात्र, भोजनासाठी वापरण्यात येणाऱ्या खाद्यपदार्थांची गुणवत्ता, अन्नसाठवणूक, पिण्याचे पाणी तसेच स्वयंपाकघरातील स्वच्छतेची नियमित तपासणी केली जाते का, असा सवाल पालकांकडून उपस्थित केला जात आहे.


काही पालकांनी भोजनात वापरण्यात आलेल्या चिकनसह इतर खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबाबतही शंका व्यक्त केली असून, भोजनाचे नमुने तातडीने जप्त करून अधिकृत प्रयोगशाळेत तपासणी करण्याची मागणी केली आहे.
अधीक्षक, मुख्याध्यापकांसह संबंधितांची चौकशी करा
या घटनेची केवळ औपचारिक चौकशी न करता आश्रमशाळेचे अधीक्षक, मुख्याध्यापक, भोजन व्यवस्था पाहणारी समिती तसेच संबंधित देखरेख करणाऱ्या अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी पालकांकडून होत आहे. निष्काळजीपणा किंवा नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधितांवर कठोर प्रशासकीय तसेच कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात येत आहे.
पालकांनी विश्वास ठेवायचा तरी कोणावर?
आपली मुले निवासी आश्रमशाळेत सुरक्षित राहतील, त्यांना वेळेवर सकस आहार मिळेल आणि त्यांच्या आरोग्याची योग्य काळजी घेतली जाईल, या विश्वासाने पालक मुलांना आश्रमशाळेत पाठवतात. मात्र, शाळेतील भोजनानंतरच मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडल्याने पालकांचा प्रशासनावरील विश्वास डळमळीत झाला आहे.
विशेषतः निवासी विद्यार्थ्यांची दिवस-रात्र जबाबदारी शाळा प्रशासनावर असताना भोजन व्यवस्थेत अशी गंभीर त्रुटी कशी झाली, याची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे.
भोजनाचे नमुने तपासा; स्वयंपाकघराचे ऑडिट करा
घटनेनंतर प्रशासनाने आश्रमशाळेतील भोजनाचे नमुने, वापरण्यात आलेले मांसाहारी पदार्थ, पिण्याचे पाणी आणि इतर खाद्यपदार्थांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवावेत, अशी मागणी होत आहे. तसेच स्वयंपाकघराची स्वच्छता, अन्नसाठवणुकीची पद्धत, खाद्यपदार्थ खरेदीची बिले व नोंदी, भोजन तयार करण्याची प्रक्रिया आणि भोजनाचे नमुने जतन करण्याची पद्धत यांची तपासणी करून संपूर्ण भोजन व्यवस्थेचे ऑडिट करण्याची मागणी करण्यात आली आहे.
प्रशासन आता तरी जागे होणार का? – विद्यार्थ्यांच्या ताटात सकस आणि सुरक्षित आहार मिळणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. भोजनानंतर मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडणे ही गंभीर बाब असून, विषबाधेचे नेमके कारण तातडीने स्पष्ट करणे आवश्यक आहे. या घटनेची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करावी आणि भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी आश्रमशाळेच्या भोजन व्यवस्थेत ठोस सुधारणा कराव्यात, अशी मागणी पालक व नागरिकांकडून होत आहे.
