
नांदेड| राज्य सरकारकडून अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे ‘अ, ब, क, ड’ असे उपवर्गीकरण करण्याची प्रक्रिया सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर या निर्णयाला विरोध करण्यासाठी रविवारी नांदेडमध्ये आरक्षण उपवर्गीकरण विरोधी महामोर्चा काढण्यात आला. अनुसूचित जातीतील विविध समाजबांधवांचा मोठा जनसमुदाय या महामोर्चात सहभागी झाला.




महात्मा फुले पुतळा येथून महामोर्चाला सुरुवात झाली. विविध घोषणा देत मोर्चेकरी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने रवाना झाले. अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण केल्यास समाजातील ५९ अनुसूचित जातींवर त्याचा परिणाम होईल, असा दावा आंदोलकांनी केला. राज्य सरकारने आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची प्रक्रिया तातडीने थांबवावी, अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली.




आरक्षणाच्या प्रश्नावर अनुसूचित जातीतील समाजबांधवांनी मोठ्या संख्येने एकत्र येत आपला विरोध सरकारपर्यंत पोहोचवला. महामोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. राहुल कर्डिले यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी आरक्षणाचे उपवर्गीकरण न करण्याची मागणी करत शासनाने समाजाच्या भावनांचा गांभीर्याने विचार करावा, अशी भूमिका आंदोलकांनी मांडली.



या महामोर्चामुळे नांदेडमध्ये आरक्षण उपवर्गीकरणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून, शासनाच्या पुढील भूमिकेकडे अनुसूचित जातीतील समाजबांधवांचे लक्ष लागले आहे.


