
देगलूर, गंगाधर मठवाले| शहापूर परिसरातील नागरिक, शेतकरी आणि प्रवाशांना धर्माबादच्या बाजारपेठेत ये-जा करण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शहापूर मार्गे धर्माबाद बससेवा तातडीने सुरू करण्यात यावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.



धर्माबाद येथील बाजारपेठेत विविध प्रकारच्या शेतीमालाला चांगली मागणी असल्याने शहापूर परिसरातील शेतकरी भाजीपाला तसेच विविध पिकांची लागवड करून तो माल विक्रीसाठी धर्माबाद येथे घेऊन जातात. मात्र शहापूरहून धर्माबादला जाण्यासाठी थेट बससेवा उपलब्ध नसल्याने नागरिकांना वनाळी मार्गे प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि प्रवासाचा खर्च दोन्ही वाढत आहेत.



शहापूर परिसरातून धर्माबादकडे नियमित प्रवास करणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. मात्र थेट बससेवा नसल्याने महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी तसेच शेतकरी यांना विशेषतः गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.


यापूर्वी देगलूर आगार प्रमुख आकुलवार यांच्याकडे पत्रकार तथा व्हॉईस ऑफ मीडिया तालुकाध्यक्ष भागवत पाडवे आणि गंगाधर मठवाले यांनी शहापूर मार्गे धर्माबाद बस सुरू करण्याची मागणी केली होती. त्यावेळी चार्जिंग बस उपलब्ध झाल्यानंतर शहापूर मार्गे धर्माबाद बससेवा सुरू करण्याचे आश्वासन देण्यात आले होते.


मात्र अद्यापही बससेवा सुरू न झाल्याने आगार प्रमुखांना दिलेल्या आश्वासनाचा विसर पडला की काय?, असा सवाल बसच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या मागणीची तातडीने दखल घेऊन शहापूर मार्गे धर्माबाद बससेवा सुरू करावी, अशी मागणी ग्रामस्थ आणि प्रवाशांकडून होत आहे. बससेवा सुरू झाल्यास शहापूर परिसरातील नागरिक, शेतकरी आणि विद्यार्थ्यांना धर्माबादकडे ये-जा करणे अधिक सोयीचे होणार आहे.
