
नांदेड| होळकर घराण्याचे वंशज श्रीमंत भूषणसिंह महाराज यांचे काल नांदेड येथे मनःपूर्वक स्वागत करण्यात आले. यावेळी नांदेड महानगरपालिका हद्दीत उभारण्यात येत असलेल्या लोकमाता अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याच्या कामाची पाहणी करण्यात आली.



पुतळ्याच्या कामाच्या प्रगतीचा आढावा घेत काम अधिक दर्जेदार, भव्य आणि नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. तसेच कामाच्या गुणवत्तेबाबत आवश्यक त्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या.



लोकमाता अहिल्याबाई होळकर यांच्या कार्याचा आणि कर्तृत्वाचा गौरव करणारा हा पुतळा त्यांच्या स्मृतीला साजेसा असावा, यासाठी कामाला आवश्यक गती देऊन दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याची अपेक्षा श्रीमंत भूषणसिंह महाराज यांच्याकडून व्यक्त करण्यात आली.


यावेळी महानगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अभियंता दिलीप टाकळकर, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चे सचिन पाटील, राष्ट्रीय पक्षप्रमुख शिवकुमार देवकते, काँग्रेसचे विठ्ठल पावडे, सचिन किस्से, हाके सर, लेखक मोरे सर, गरवारे, प्रदीप सरोदे, गोविंद गोरे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.


लोकमाता अहिल्याबाई होळकर यांच्या सामाजिक कार्याची, न्यायप्रियतेची आणि लोककल्याणकारी विचारांची प्रेरणा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी नांदेडमध्ये उभारण्यात येणारा हा पुतळा महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे यावेळी उपस्थितांनी सांगितले.
