
शहापूर ग्रामपंचायतीतील कर्तव्यदक्ष कार्याची दखल; अधिकारी व मित्रमंडळींकडून अभिनंदन
देगलूर /शहापूर, गंगाधर मठवाले| शहापूर ग्रामपंचायतीचे कर्तव्यदक्ष सचिव एम. डी. शिंदे यांची देगलूर तालुका ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या कार्याध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली. त्यांच्या कार्यपद्धतीची आणि ग्रामपंचायत स्तरावर नागरिकांना दिल्या जाणाऱ्या तत्पर सेवेची दखल घेत ही निवड करण्यात आल्याने अधिकारी वर्गात समाधान व्यक्त होत आहे.



शहापूर ग्रामपंचायतीच्या सचिवपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर एम. डी. शिंदे यांनी कार्यालयीन कामकाजाला शिस्त लावत नागरिकांच्या समस्या तातडीने सोडविण्यावर भर दिला. विशेषतः सकाळच्या वेळेत नियमितपणे ग्रामपंचायत कार्यालयात उपस्थित राहून नागरिकांना आवश्यक दाखले व शैक्षणिक कागदपत्रांसाठी तालुक्याच्या ठिकाणी वारंवार हेलपाटे मारावे लागू नयेत, यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यामुळे विद्यार्थी, पालक, ज्येष्ठ नागरिक तसेच गोरगरीब नागरिकांकडून त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे.



ग्रामपंचायतीच्या कामकाजात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये समन्वय राखत योग्य प्रशासकीय मार्गदर्शन करण्याबरोबरच ग्रामपंचायतीच्या कारभारात पारदर्शकता आणण्यावर त्यांनी भर दिल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. शासनाकडून प्राप्त होणाऱ्या विविध अनुदानांचा योग्य पद्धतीने वापर करून विकासकामांना गती देण्याचा प्रयत्न त्यांच्या कार्यकाळात झाल्याचेही सांगण्यात येते.


शिंदे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांच्या कामकाजाबाबत तालुका किंवा जिल्हा स्तरावर मोठ्या स्वरूपाची तक्रार न झाल्याने त्यांची देगलूर तालुक्यात कर्तव्यदक्ष ग्रामपंचायत अधिकारी म्हणून ओळख निर्माण झाली आहे. त्यांच्या याच कार्याची दखल घेत ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या कार्याध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.


या निवडीबद्दल अधिकारी वर्ग, ग्रामपंचायत कर्मचारी, मित्रमंडळी तसेच शहापूर ग्रामस्थांकडून एम. डी. शिंदे यांचे अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
