शहापूर येथे ड्रोनच्या सहाय्याने सोयाबीन पिकावर फवारणी

मजुरांची कमतरता, वेळेची बचत आणि अचूक फवारणी; शेतकरी गटाचा आधुनिक तंत्रज्ञानाकडे कल

देगलूर/शहापूर, गंगाधर मठवाले| खरीप हंगामात शहापूर परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सोयाबीन पिकाची लागवड केली आहे. पिकांवर कीड व रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये तसेच उत्पादनात भरघोस वाढ व्हावी, यासाठी शेतकऱ्यांकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र, शेतीच्या कामांसाठी मजुरांची दिवसेंदिवस जाणवणारी कमतरता आणि वाढलेली मजुरी यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. या समस्येवर उपाय म्हणून शहापूर येथील शेतकरी गटाने तब्बल साडेपाच लाख रुपये खर्च करून ड्रोन मशीन खरेदी केली असून, त्याद्वारे सोयाबीन पिकावर फवारणी सुरू केली आहे.

पारंपरिक पद्धतीने पिकांवर फवारणी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मजुरांची आवश्यकता असते. मात्र, ग्रामीण भागात मजुरांची संख्या कमी होत असल्याने शेतकऱ्यांना फवारणीसह निंदणी, कोळपणी आणि इतर शेतीच्या कामांसाठी मजुरांचा शोध घेत फिरावे लागत आहे. त्यातच मजुरांना सुमारे ८०० रुपये मजुरी देऊनही वेळेवर मजूर उपलब्ध होत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

पावसाळ्यात शेतात चिखल असल्याने अनेक मजूर शेतातील काम करण्यास तयार होत नाहीत. त्यामुळे पिकांवर वेळेत फवारणी करणे शेतकऱ्यांसाठी मोठी अडचण ठरते. यावर शहापूरच्या शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेत ड्रोनच्या माध्यमातून फवारणी करण्याचा निर्णय घेतला आहे.

कमी वेळात मोठ्या क्षेत्रावर फवारणीड्रोनच्या सहाय्याने कमी वेळेत मोठ्या क्षेत्रावर फवारणी करता येत असल्याने शेतकऱ्यांचा वेळ व श्रम वाचत आहेत. तसेच फवारणी पिकावर योग्य प्रमाणात आणि एकसमान पद्धतीने होत असल्याने औषधांचा प्रभावी वापर होत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. पारंपरिक फवारणीच्या तुलनेत शेतात जाण्याची, पिकांची नासधूस होण्याची आणि मजुरांवर अवलंबून राहण्याची गरजही कमी होत आहे.

शहापूर परिसरातील शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्यासाठी पुढाकार घेत असून, नवीन यंत्रसामग्री, सुधारित बियाणे आणि आधुनिक शेती पद्धतींचा प्रयोग करून उत्पादन वाढविण्याचा प्रयत्न करीत आहेत. मजुरांची कमतरता ही समस्या मानण्याऐवजी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून त्यावर तोडगा काढण्याचा शहापूरच्या शेतकऱ्यांचा हा प्रयोग इतर शेतकऱ्यांसाठीही मार्गदर्शक ठरणारा आहे.

ड्रोनच्या माध्यमातून कमी वेळात, कमी पाण्यात आणि अधिक अचूक पद्धतीने फवारणी होत असल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. भविष्यात शेतीमध्ये अशाच प्रकारे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढल्यास मजूरटंचाईच्या समस्येवर मोठ्या प्रमाणात मात करता येईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!