कंधार पंचायत समितीत संघर्षाची ठिणगी’; ग्रामसेवक संघटनेचा एल्गार, बैठकीवर बहिष्कार

‘बदली झाल्याशिवाय माघार नाही’; विस्तार अधिकाऱ्यांविरोधात आक्रमक भूमिका, सहा मागण्यांचे निवेदन

कंधार, सचिन मोरे| कंधार पंचायत समितीतील प्रशासकीय वातावरण बुधवारी चांगलेच तापले. महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटना, तालुका शाखा कंधारने पंचायत समितीच्या मासिक बैठकीवर बहिष्कार टाकत प्रशासनाविरोधात उघड एल्गार पुकारला. विस्तार अधिकारी के.व्ही. रेणेवाड यांची तालुक्याबाहेर बदली, ग्रामपंचायत अधिकाऱ्यांवरील कथित मानसिक व आर्थिक पिळवणूक थांबविणे, घरकुल योजनांतील कथित गैरप्रकारांची चौकशी यासह सहा प्रमुख मागण्यांचे निवेदन गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आले.

संघटनेने स्पष्ट केले की, ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या विविध अडचणी आणि तक्रारी वारंवार मांडूनही त्यावर कोणतीही ठोस कार्यवाही झाली नाही. अधिकाऱ्यांशी अपमानास्पद वागणूक, कथित आर्थिक देवाणघेवाण आणि कामकाजातील अडथळ्यांमुळे अधिकारी वर्गात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळेच बैठकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे संघटनेने म्हटले आहे.

निवेदनात विस्तार अधिकारी के. व्ही. रेणेवाड यांची तातडीने बदली, ग्रामपंचायत अधिकाऱ्यांशी सन्मानाने वागणूक, घरकुल कंत्राटी अभियंत्यांच्या कामकाजाची चौकशी, कथित गैरप्रकारांवर कारवाई, आर्थिक व्यवहारांवर निर्बंध तसेच मौजे दिग्रस (बु.) येथील ग्रामपंचायत अधिकारी वर्षा पवार यांची वारंवार होणारी बदली रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. अध्यक्ष विलास नारनाळीकर यांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला. विस्तार अधिकारी के. व्ही. रेणेवाड यांची बदली होत नाही, तोपर्यंत आंदोलन आणि बैठकीवरील बहिष्कार कायम राहील. ग्रामसेवकांच्या स्वाभिमानाशी तडजोड केली जाणार नाही.

या आंदोलनात सचिव जगदेव शिंदे, कार्याध्यक्ष एम. बी. शिंदे, मानद अध्यक्ष एन. डी. सोनटक्के, कोषाध्यक्ष विश्वनाथ केंद्रे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. त्यांनी प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला.

दरम्यान, ग्रामसेवक संघटनेच्या या आक्रमक भूमिकेमुळे पंचायत समितीतील प्रशासन आणि अधिकारी संघटना आमनेसामने आल्याचे चित्र निर्माण झाले आहे. मात्र, संघटनेने केलेल्या आरोपांवर संबंधित प्रशासनाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे या संघर्षाचा पुढील टप्पा काय असणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

बदली झाल्याशिवाय माघार नाही- विलास नारनाळीकर – कंधार पंचायत समितीचे विस्तार अधिकारी के. व्ही. रेणेवाड यांची एकाधिकार शाहीला सर्व ग्रामसेवक कंटाळले असून त्यांची तात्काळ बदली झाल्याशिवाय ग्रामसेवक संघटना हे आंदोलन माघार घेणार नाही असा ठाम निर्धार ग्रामसेवक संघटनेचे तालुकाध्यक्ष विलास नारनाळीकर यांनी ALMBharat चे प्रतिनिधिशी बोलताना व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!