
कारला येथील शाळेत विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुलले आनंदाचे हास्य



हिमायतनगर, प्रतिनिधी| 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर हिमायतनगर शिक्षण विभागाच्या वतीने तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे वाटप करण्यात आले. त्याच अनुषंगाने कारला येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनाही शालेय गणवेशाचे वाटप करण्यात आले.



शिक्षण विभागाकडून दरवर्षी जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शालेय गणवेश तसेच पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात येते. यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरजू विद्यार्थ्यांना मोठा आधार मिळत असून, सर्व विद्यार्थ्यांना समानतेची भावना निर्माण होण्यास मदत होत आहे.


यंदाही १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनापूर्वी कारला येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. नवीन गणवेश परिधान करून विद्यार्थी स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.


यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका आशाताई बोयले, सहशिक्षक शुभम धनुसकर, शालेय समितीचे उपाध्यक्ष नागसेन गोखले, विठ्ठल सूर्यवंशी, विमलबाई गोखले यांच्यासह विद्यार्थी व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिक्षण विभागाच्या या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासोबतच त्यांच्या मनात शाळा व शिक्षणाबद्दल सकारात्मक वातावरण निर्माण होत असल्याचे यावेळी उपस्थितांनी सांगितले.
