
भाविकांना त्रास होऊ नये यासाठी पावसामुळे निर्माण झालेले खड्डे तातडीने बुजविण्याची नगराध्यक्ष रफिक सेठ यांच्याकडे मागणी



हिमायतनगर, अनिल मादसवार| श्री परमेश्वर मंदिर ते जिल्हा परिषद शाळा या मार्गावरील अतिक्रमण हटवून वाहतुकीसाठी रस्ता मोकळा केल्याबद्दल श्री परमेश्वर मंदिर ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी नगराध्यक्ष रफिक सेठ यांच्यासह नगरपंचायत प्रशासनाचे अभिनंदन करत आभार व्यक्त केले. मात्र, पुन्हा अतिक्रमण होणार नाही यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणीही एका निवेदणाद्वारे करण्यात आली.



नगरपंचायतचे लोकनियुक्त नगराध्यक्ष शेख रफिक शेख महेबूब यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, नगरपंचायत प्रशासनाने नुकतेच अतिक्रमण हटविल्यामुळे सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थी, भाविक आणि वाहनधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता या मार्गावर पुन्हा हातगाडे, पानटपऱ्या किंवा इतर अतिक्रमण होऊ नये, यासाठी प्रशासनाने विशेष दक्षता घ्यावी, अशी मागणी करण्यात आली.



येत्या १२ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या पवित्र श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर श्री परमेश्वर मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या काळात तेलंगणा, विदर्भ, मराठवाडा, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकसह विविध भागांतून हजारो भाविक दर्शनासाठी येतात. त्यामुळे मंदिर परिसरात वाहतूक कोंडी होऊ नये, भाविकांना कोणताही त्रास होऊ नये तसेच पावसामुळे रस्त्यावर निर्माण झालेले खड्डे तातडीने बुजवावेत, अशी मागणी लोकनियुक्त नगराध्यक्ष शेख रफिक शेख मेहबूब यांच्याकडे करण्यात आली आहे.



यावेळी उपनगराध्यक्ष विनोद गुंडेवार, लेखापाल ज्ञानेश्वर चिंते, लिपिक विठ्ठल शिंदे, पत्रकार सोपान बोंपीलवार, मारोती वाडेकर, दत्ता पुपलवाड यांच्यासह नगरपंचायतीचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

या निवेदनावर श्री परमेश्वर मंदिराच्या पदसिद्ध अध्यक्षा तथा तहसीलदार सौ. पल्लवी टेमकर, उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ, सचिव अनंता देवकते, संचालक प्रकाश कोमावार, श्याम पवनेकर, विठ्ठलराव वानखेडे, सौ.लताबाई मुलंगे, श्रीमती लताताई पाध्ये, श्रीमती मथुराबाई भोयर, राजाराम झरेवाड, प्रकाश शिंदे, वामनराव बनसोडे, माधवराव पाळजकर, शांतीलाल श्रीश्रीमाळ, ऍड दिलीप राठोड, अनिल मादसवार, संजय माने, विलास वानखेडे, गजानन मुत्तलवाड, आदिसह अनेकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
