नंदीग्राममधील कृष्णा चौकातील भुयारी ड्रेनेज लाईन दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर

रस्ता खचून ट्रक अडकल्यानंतर महापालिकेची तातडीची कारवाई; वाहतूक वळवली
नांदेड | नांदेड शहरातील नंदीग्राम सोसायटीच्या कृष्णा चौकात मुख्य भुयारी ड्रेनेज लाईनवरील रस्ता खचून रेतीने भरलेला ट्रक अडकल्यानंतर महानगरपालिका प्रशासनाने तातडीने कारवाई करत दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे.

महापालिकेच्या माहितीनुसार, ४०० मिमी व्यासाच्या जुन्या भुयारी ड्रेनेज लाईनवरून अवजड रेतीचा ट्रक गेल्यामुळे काळ्या मातीचा भाग आतून कोसळला. त्यामुळे ड्रेनेज लाईनचे नुकसान होऊन रस्त्याखाली मोठी पोकळी निर्माण झाली आणि त्यात ट्रक अडकला.

घटनेची माहिती मिळताच महानगरपालिकेच्या अभियंत्यांनी आणि आपत्कालीन पथकाने घटनास्थळी धाव घेत क्रेनच्या सहाय्याने ट्रक सुरक्षितपणे बाहेर काढला. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने परिसरात बॅरिकेड्स उभारण्यात आले असून या मार्गावरील वाहतूक तात्पुरती वळविण्यात आली आहे.

सध्या मुख्य ड्रेनेज लाईन आणि ४०० मिमी व्यासाच्या वाहिनीची जोडणी, रस्त्याखाली निर्माण झालेली पोकळी भरणे आणि रस्ता पूर्ववत करण्याचे काम वेगाने सुरू आहे. हे काम लवकर पूर्ण करून नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी महापालिकेचे तांत्रिक पथक अहोरात्र कार्यरत असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.दरम्यान, दुरुस्तीचे काम पूर्ण होईपर्यंत नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिकेने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!