
डॉ. पृथ्वीराज तौर यांच्या अनुवादित संग्रहात २५ देशांतील ३१ कवींच्या कवितांचा समावेश
नांदेड | स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख डॉ. पृथ्वीराज तौर यांनी अनुवादित केलेल्या ‘विश्वकाव्याचा संस्कृती उत्सव’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन महाराष्ट्राचे मराठी भाषा व उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते नांदेड येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवनात आयोजित ‘नांदेड जिल्ह्यातील साहित्यिकांशी संवाद’ कार्यक्रमात करण्यात आले.



यावेळी आमदार बालाजी कल्याणकर, बाबुराव कोहळीकर, आनंदराव बोंढारकर, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, महापालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक डॉ. श्यामकांत देवरे, अप्पर जिल्हाधिकारी डॉ. रत्नदीप गायकवाड, ज्येष्ठ नाटककार दत्ता भगत, साहित्य अकादमी पुरस्कार विजेते श्रीकांत देशमुख, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष देविदास फुलारी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.



‘विश्वकाव्याचा संस्कृती उत्सव’ या संग्रहात २५ देशांतील ३१ कवींच्या कवितांचे मराठी अनुवाद समाविष्ट आहेत. या संग्रहाचे संपादन प्रा. स्वाती काटे यांनी केले आहे. या माध्यमातून इजिप्त, मलेशिया, थायलंड, ब्रुनेई दारुस्सलाम, निकाराग्वा, मेक्सिको, इराण, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर, फिलिपिन्स, पॅलेस्टाईन आदी देशांतील समकालीन कवींच्या कविता प्रथमच मराठी वाचकांसाठी उपलब्ध झाल्या आहेत.


डॉ. पृथ्वीराज तौर यांना वर्ल्ड ऑर्गनायझेशन ऑफ रायटर्स, मॉस्को (रशिया) या संस्थेचा सिल्व्हर मेडल तसेच नॅशनल रायटर्स असोसिएशन ऑफ साऊथ आफ्रिका या संस्थेचा साहित्य पुरस्कार प्राप्त झाला आहे.


या प्रकाशन सोहळ्यानिमित्त साहित्यिक श्रीकांत देशमुख, देविदास फुलारी, दत्ता डांगे, निर्मलकुमार सूर्यवंशी, महेश मोरे, राम तरटे, श्रीनिवास मस्के, अमृत तेलंग यांच्यासह अनेक साहित्यिकांनी डॉ. पृथ्वीराज तौर यांचे अभिनंदन करत त्यांच्या साहित्यसेवेचा गौरव केला.
