
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) चे तालुकाध्यक्ष पांडुरंग शिंदे यांचे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन
नायगाव | नायगाव तालुक्यातील मांजरम येथील सर्व अंगणवाड्यांचे तातडीने सर्वेक्षण करून जीर्ण व धोकादायक इमारतींच्या जागी नवीन सुसज्ज अंगणवाडी इमारती मंजूर कराव्यात तसेच शैक्षणिक साहित्य, खेळणी, फर्निचर आणि इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) चे नायगाव तालुकाध्यक्ष पांडुरंग शिंदे (मांजरमकर) यांनी गटविकास अधिकारी श्री. वानखेडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.



निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, मांजरम येथील काही अंगणवाड्या अत्यंत जीर्ण अवस्थेत असून अंगणवाडी क्रमांक २ ची इमारत वापरण्यास अयोग्य झाली आहे. त्यामुळे लहान बालकांना पर्यायी ठिकाणी शिक्षण घ्यावे लागत आहे. अनेक अंगणवाड्यांमध्ये शैक्षणिक साहित्य, खेळणी, फर्निचर, बसण्याची व्यवस्था, स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी आणि इतर आवश्यक सुविधांचा अभाव असल्याने बालकांच्या सर्वांगीण विकासावर परिणाम होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.



यामुळे संबंधित विभागाने सर्व अंगणवाड्यांचे प्रत्यक्ष सर्वेक्षण करून आवश्यक त्या ठिकाणी नवीन इमारती मंजूर कराव्यात तसेच सर्व अंगणवाड्यांना आवश्यक साहित्य व सुविधा तातडीने उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली.


यावेळी तालुका सरचिटणीस किरण वाघमारे, व्यंकट अण्णा शिंदे, विश्नभर शिंदे, मधुकर शिंदे, गंगाधर शिंदे, गणेश वाघमारे, रोहिदास नव्हारे आणि काशिनाथ बाळापुरे उपस्थित होते.


घरकुल लाभार्थ्यांची थकीत बिलेही तातडीने द्या
याचवेळी पांडुरंग शिंदे यांनी नायगाव तालुक्यातील घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांची थकीत बिले तात्काळ अदा करण्यात यावीत, अशी स्वतंत्र मागणीही गटविकास अधिकारी श्री. वानखेडे यांच्याकडे केली. त्यांनी घरकुल लाभार्थ्यांना विलंब न करता निधी उपलब्ध करून देण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.
