
वजीराबाद पोलिसांच्या सहकार्याने मोबाईल सुरक्षित परत; माणुसकीचा दिला प्रेरणादायी संदेश
नांदेड, प्रतिनिधी| आजच्या धावपळीच्या आणि स्वार्थी वाटणाऱ्या काळातही प्रामाणिकपणा आणि माणुसकी जिवंत असल्याचे उदाहरण नांदेडमध्ये पाहायला मिळाले. महावीर चौक परिसरातील व्यावसायिक संतोष अमीलकंठवार यांनी रस्त्यावर सापडलेला मोबाईल स्वतःकडे न ठेवता वजीराबाद पोलिसांच्या मदतीने तो त्याच्या मूळ मालकापर्यंत सुरक्षित पोहोचवून समाजासमोर आदर्श निर्माण केला.



संतोष अमीलकंठवार हे दुकान बंद करून घरी जात असताना त्यांना रस्त्याच्या कडेला एक मोबाईल पडलेला दिसला. मोबाईलमधील उपलब्ध माहितीच्या आधारे त्यांनी तातडीने वजीराबाद पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी आवश्यक चौकशी करून मोबाईलच्या मालकाशी संपर्क साधला. चौकशीनंतर हा मोबाईल कौशिक मोलणकळ यांचा असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांच्या उपस्थितीत मोबाईल सुरक्षितपणे त्यांच्या ताब्यात देण्यात आला.



हरवलेला मोबाईल परत मिळाल्याने कौशिक मोलणकळ यांनी संतोष अमीलकंठवार तसेच वजीराबाद पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले. या कार्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल दुरपडे, एएसआय शेख, पोलीस कॉन्स्टेबल मनीषा कदम आणि पोलीस कॉन्स्टेबल सत्यनारायण सुरनर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.


संतोष अमीलकंठवार यांच्या प्रामाणिकपणाचे आणि सामाजिक बांधिलकीचे नागरिकांकडून कौतुक होत असून, त्यांच्या या कृतीमुळे समाजात विश्वास, प्रामाणिकपणा आणि माणुसकीची मूल्ये अधिक दृढ होत असल्याच्या भावना व्यक्त केल्या जात आहेत.


