कर्जमाफीच्या प्रतीक्षेत शेतकऱ्याची आत्महत्या? कुटुंबीयांचा दावा, अधिकृत तपास सुरू

वारंगटाकळीतील शेतकरी चंद्रभान कदम यांनी विष प्राशन करून संपविले जीवन
हिमायतनगर, प्रतिनिधी| हिमायतनगर तालुक्यातील वारंगटाकळी येथील शेतकरी चंद्रभान दादाराव कदम (वय ६०) यांनी शेतातील विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी (दि. ४ ऑगस्ट) घडली. त्यांना तातडीने हिमायतनगर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी मृत घोषित केले.

कुटुंबीयांच्या माहितीनुसार, चंद्रभान कदम हे शेतीच्या कर्जामुळे आर्थिक विवंचनेत होते. शासनाच्या अहिल्याबाई होळकर कर्जमाफी योजनेचा लाभ मिळावा यासाठी त्यांनी अनेकदा बँकेच्या फेऱ्या मारल्या तसेच सेतू केंद्रावर आवश्यक प्रक्रिया पूर्ण केली होती. मात्र अद्याप कर्जमाफीचा लाभ न मिळाल्याने ते मानसिक तणावाखाली असल्याचा दावा त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे.

मृताचे पुत्र निवृत्ती कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आणि आर्थिक अडचणींमुळे आलेल्या नैराश्यातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मात्र, आत्महत्येचे नेमके कारण अधिकृत तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.

या घटनेमुळे वारंगटाकळी गावासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पात्र शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची प्रकरणे तातडीने निकाली काढावीत तसेच मृत शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थ आणि शेतकरी वर्गातून करण्यात येत आहे.

मृत चंद्रभान कदम यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी आणि नातू असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर वारंगटाकळी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!