बेटक बिलोली जि.प. शाळेचे शिक्षक आयुबखान पठाण यांचा सेवापूर्ती कार्यगौरव सोहळा उत्साहात

हिमायतनगर, प्रतिनिधी| बेटक बिलोली येथील जिल्हा परिषद शाळेचे ज्येष्ठ शिक्षक आयुबखान चाँदखान पठाण हे ३१ जुलै रोजी शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाले. त्यांच्या प्रदीर्घ, प्रामाणिक आणि विद्यार्थीकेंद्री शैक्षणिक सेवेचा गौरव करण्यासाठी ग्रामस्थ, शिक्षक आणि शिक्षणप्रेमींच्या वतीने सेवापूर्ती कार्यगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. हा सोहळा १ ऑगस्ट रोजी नरसी येथील आदित्य गार्डन (फंक्शन हॉल) येथे उत्साहपूर्ण आणि भावनिक वातावरणात पार पडला.

कार्यक्रमाला प्रकाश पाटील भिलवंडे, सरपंच सौ. सविताताई राहुल पाटील नकाते, शिक्षण विस्तार अधिकारी उद्धव ढगे, केंद्रप्रमुख उमाकांत डिंगणे, केंद्रप्रमुख कपिलेश्वर नलबलवार, वीरभद्र मिरेवाड, मंगनाळे, राहुल पाटील नकाते, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर पवार, सदस्य सुरेश पवार, रामकिशन पवार, गजानन नकाते, माजी चेअरमन माणिकराव भरकांड तसेच पोलीस पाटील भागवत पाटील भुताळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी मान्यवरांनी आयुबखान पठाण यांच्या शैक्षणिक कार्याचा गौरव करताना विद्यार्थ्यांप्रती असलेली त्यांची निष्ठा, वेळेचे काटेकोर पालन, शिस्तबद्ध कार्यपद्धती आणि प्रभावी अध्यापनशैलीचे विशेष कौतुक केले. अनेक विद्यार्थ्यांच्या आयुष्याला योग्य दिशा देण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले असून, त्यांचे कार्य भावी शिक्षकांसाठी प्रेरणादायी असल्याच्या भावना उपस्थितांनी व्यक्त केल्या.

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापक आर. एच. मट्टमवार, वडजकर सर, शिंदे सर, शेख सर, सालेगाये सर, उगीले सर तसेच शाळेतील सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक, अंगणवाडी सेविका, मदतनीस, माजी विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भावनिक वातावरणात पार पडलेल्या या सोहळ्यात उपस्थितांनी आयुबखान पठाण यांना शाल, श्रीफळ, पुष्पहार व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित केले आणि त्यांच्या निरोगी, आनंदी व दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!