
रस्ते झाले मोकळे… पण अनेकांच्या चुली विझण्याची भीती!
हिमायतनगर, प्रतिनिधी| हिमायतनगर शहरातील मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमणाविरोधात नगरपंचायत प्रशासनाने सोमवारी (दि. ३ ऑगस्ट) पोलीस बंदोबस्तात धडक कारवाई करत शहरातील प्रमुख मार्ग अतिक्रमणमुक्त केले. या कारवाईमुळे वाहतुकीचा मार्ग मोकळा झाला, नागरिकांनीही समाधान व्यक्त केले. मात्र, दुसरीकडे हातावर पोट असलेल्या फेरीवाले, हातगाडे चालक आणि लहान व्यावसायिकांसमोर उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे.



नगरपंचायतीकडे शहरातील वाढत्या अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी, पादचाऱ्यांची गैरसोय आणि अपघातांचा धोका वाढत असल्याच्या तक्रारी सातत्याने येत होत्या. त्यानुसार प्रशासनाने सुमारे सहा महिन्यांपूर्वी व्यापारी, फेरीवाले आणि हातगाडेधारकांना ध्वनिक्षेपकाद्वारे सूचना देऊन अतिक्रमण स्वखुशीने हटविण्याचे आवाहन केले होते. काहींना नोटिसाही बजावण्यात आल्या होत्या. मात्र, विधान परिषद आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकांमुळे ही मोहीम काही काळ रखडली.



निवडणुका संपताच प्रशासनाने पुन्हा कारवाईचा बडगा उगारला. उमर चौक, श्री परमेश्वर मंदिर रस्ता कमान, परमेश्वर मंदिर परिसर, पळसापूर कॉर्नर ते चौपाटीपर्यंत रस्त्यालगतची अतिक्रमणे हटविण्यात आली. अनेक हातगाडे, तात्पुरती दुकाने आणि रस्त्यावरील व्यवसाय हटविण्यात आल्याने मुख्य रस्ते मोकळे झाले आणि वाहतुकीचा वेग वाढला.


मात्र, कारवाईनंतर अनेक फेरीवाल्यांनी भावना व्यक्त करत, “आम्ही नियमांचे पालन करण्यास तयार आहोत; पण पर्यायी जागा न देता व्यवसाय हटविल्याने आमच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे,” अशी खंत व्यक्त केली. नगरपंचायतीने अधिकृत फेरीवाला झोन किंवा नियोजित जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.


या मोहिमेमुळे शहरातील वाहतुकीचा प्रश्न काही प्रमाणात सुटला असला, तरी गरीब आणि लहान व्यावसायिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. रस्ते मोकळे करणे ही प्रशासनाची जबाबदारी असली, तरी रोजगार हिरावलेल्या कुटुंबांना पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देणे हीदेखील तितकीच महत्त्वाची सामाजिक जबाबदारी आहे, अशी चर्चा शहरात रंगू लागली आहे.

ही अतिक्रमण हटाव मोहीम मुख्याधिकारी गौरव वांडेकर व पोलीस निरीक्षक केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यावेळी कार्यालयीन अधीक्षक राहुल बोकारे, अभियंता नरेश काटकर, विठ्ठल शिंदे, ज्ञानेश्वर चिंते, बालाजी हार्डपकर, पोलीस उपनिरीक्षक शेख तसेच नगरपंचायत व पोलीस प्रशासनाचे अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
