जिगळा येथे किन्नर गुरूंची भव्य आखाड पाणी पूजा; संत-महंतांच्या उपस्थितीत दिव्य मिरवणूक, महाप्रसादाचे आयोजन

नांदेड /बिलोली, प्रतिनिधी| नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील जिगळा (क्र. १) येथे मंगळवार, दि. ४ ऑगस्ट २०२६ रोजी किन्नर समाजाच्या धार्मिक परंपरेनुसार भव्य आखाड पाणी पूजा, दिव्य अभिषेक, शोभायात्रा आणि महाप्रसादाचा धार्मिक सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यास देशभरातील संत-महंत, किन्नर गुरू, महामंडलेश्वर आणि हजारो भाविक उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

या धार्मिक सोहळ्यास श्री श्री १००८ महंत उमाशंकर भारतीजी महाराज (काशी), माहूर पीठाधीश्वर श्री श्री १००८ महंत डॉ. धनेश्वर भारतीजी महाराज, श्री श्री १००८ महंत ज्ञानेश्वर भारतीजी महाराज (क्षेत्र माहूर), आंतरराष्ट्रीय किन्नर आखाड्याच्या आचार्य महामंडलेश्वर डॉ. लक्ष्मीनारायण त्रिपाठी, नांदेडच्या श्री आदि गादीपती किन्नर गुरू रंजीता नायक तसेच महाराष्ट्र राज्य तृतीयपंथी हक्क व कल्याण मंडळाच्या सह-उपाध्यक्षा डॉ. सान्वी जेठवाणी यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी १०.३० वाजता दिव्य अभिषेकाने होईल. त्यानंतर संत-महंतांच्या आशीर्वादाने भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. या मिरवणुकीत विविध धार्मिक झांकी, भजनी मंडळे, वारकरी संप्रदाय, किन्नर आखाड्याचे प्रतिनिधी, महंत, महामंडलेश्वर तसेच विविध सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर सहभागी होणार आहेत. पारंपरिक वाद्यांचा गजर, जयघोष आणि भक्तिमय वातावरणात ही मिरवणूक परिसरातून मार्गक्रमण करणार आहे.

दरवर्षीप्रमाणे आयोजित होणाऱ्या या महोत्सवाचे आयोजन किन्नर विकास परिषद, देवगिरी प्रांतच्या संयोजिका व जिगळा येथील गुरुमाय फरीदा वकश यांच्या पुढाकाराने करण्यात आले आहे. धार्मिक परंपरा, अध्यात्म, सामाजिक समरसता आणि मानवकल्याणाचा संदेश देणारा हा महोत्सव परिसरातील महत्त्वाचा धार्मिक उत्सव म्हणून ओळखला जातो.

आयोजकांच्या माहितीनुसार, या सोहळ्यात सर्वधर्म समभाव, राष्ट्रहित, विश्वशांती, सामाजिक ऐक्य आणि सर्व समाजाच्या सुख-समृद्धीसाठी विशेष पूजा व प्रार्थना करण्यात येणार आहे. किन्नर समाजाविषयी समाजात असलेल्या गैरसमजुती दूर करून त्यांच्या धार्मिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेची ओळख सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविणे हा देखील या कार्यक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचे सांगण्यात आले.

कार्यक्रमानंतर सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून, या ऐतिहासिक धार्मिक सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहून संत-महंत व किन्नर गुरूंचे आशीर्वाद घ्यावेत, असे आवाहन फरीदा वकश, अमर गोधने, राजू कांबळे आणि समस्त जिगळा ग्रामस्थांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!