
नांदेड | महाराष्ट्र शासनाच्या जनकल्याणकारी उपक्रमांतर्गत मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड यांच्या समन्वयाने जिल्हाभर आयोजित करण्यात आलेल्या मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांचा यशस्वी समारोप झाला. १ ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत ग्रामीण व शहरी भागात आयोजित १२२ शिबिरांमध्ये १३ हजार ६१९ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली, तर ३ हजार १२१ आयुष्मान भारत व आभा कार्डांची नोंदणी करण्यात आली.



मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे कक्षप्रमुख तथा विशेष कार्य अधिकारी रामेश्वर नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राज्यभर राबविण्यात आला.



नांदेड जिल्ह्यात हा उपक्रम जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील, नांदेड-वाघाळा महानगरपालिकेचे आयुक्त महेशकुमार डोईफोडे आणि निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडला.


आरोग्य तपासणीसह विविध सेवा – शिबिरांमध्ये ४,२१० पुरुष, ६,७२२ महिला, १,०६९ पुरुष बालक आणि १,६१८ महिला बालक, अशा एकूण १३,६१९ नागरिकांनी आरोग्य तपासणीचा लाभ घेतला. नागरिकांची रक्तदाब, मधुमेह, हिमोग्लोबिनसह विविध निदान चाचण्या करून वैद्यकीय सल्ला देण्यात आला. गरजू रुग्णांना पुढील उपचारांसाठी संबंधित रुग्णालयांकडे संदर्भित करण्यात आले. याशिवाय महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना, आयुष्मान भारत योजना, मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि इतर शासकीय आरोग्य योजनांची माहितीही नागरिकांना देण्यात आली.


विविध यंत्रणांचा प्रभावी समन्वय – शिबिरांच्या नियोजन आणि अंमलबजावणीत डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजयकुमार कापसे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय परके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष सूर्यवंशी आणि महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. हनमंत रीठ्ठे यांनी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले.
मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे डॉ. चंद्रकांत मुंडे, गजानन वानखेडे आणि संभाजी लोंढे यांनी विविध शासकीय व संलग्नित खासगी रुग्णालयांशी समन्वय साधून शिबिरांचे प्रभावी नियोजन व अंमलबजावणी सुनिश्चित केली.
नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद – जिल्ह्यातील दुर्गम व गरजू नागरिकांना त्यांच्या परिसरातच आरोग्य तपासणी, निदान, वैद्यकीय मार्गदर्शन आणि पुढील उपचारासाठी संदर्भ सेवा उपलब्ध झाल्याने या जनआरोग्य शिबिरांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. भविष्यातही जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधी यांच्या समन्वयातून अशाच लोकाभिमुख आरोग्य उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
