शासकीय कार्यक्रमात जखमी दिव्यांग युवकाला महिनाभरानंतरही मदत नाही; जिल्हाधिकाऱ्यांना अंतिम स्मरणपत्र

आर्थिक मदत, उपचार खर्च व पुनर्वसनाची मागणी; भविष्यात शासकीय कार्यक्रमांत दिव्यांगांसाठी सुरक्षिततेची व्यवस्था अनिवार्य करण्याची मागणी
नांदेड, प्रतिनिधी| दि. 26 जून 2026 रोजी नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे आयोजित शासकीय कार्यक्रमादरम्यान गंभीर जखमी झालेल्या दिव्यांग युवक कार्तिक कुमार भरतीपूरम यांना घटनेनंतर तब्बल एक महिना उलटूनही कोणतीही आर्थिक मदत, उपचार खर्चाची भरपाई अथवा पुनर्वसनाबाबत ठोस मदत मिळाली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाकडे तातडीने पाठपुरावा करावा, या मागणीसाठी निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांकडे अंतिम स्मरणपत्र सादर करण्यात आले.

या प्रकरणी यापूर्वीही प्रशासनाकडे निवेदने देण्यात आली असून राज्य मानवाधिकार आयोगाकडेही तक्रार दाखल करण्यात आल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. जखमी दिव्यांग युवकाला उपलब्ध शासकीय योजनांमधून किंवा अन्य कायदेशीर मार्गाने तातडीची मदत मिळवून देण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

यासोबतच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी सर्व शासकीय कार्यक्रमांमध्ये दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक आणि इतर नागरिकांसाठी सुरक्षित प्रवेश, स्वतंत्र बसण्याची व्यवस्था, वैद्यकीय मदत, आपत्कालीन सुविधा आणि आवश्यक सुरक्षा उपाय अनिवार्य करण्यात यावेत, अशीही मागणी करण्यात आली आहे.

प्रशासनाने या मानवीय विषयाकडे संवेदनशीलतेने पाहून तातडीने आवश्यक कार्यवाही करावी, अशी अपेक्षा सकल दिव्यांग संघटना, नांदेडचे अध्यक्ष राहुल सिताराम साळवे यांनी व्यक्त केली.
यावेळी चळवळीचे सहकारी दिव्यांग बांधव मिलिंद सितळे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!