
प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांचा संताप; बंधाऱ्याची उंची वाढविण्याची मागणी पुन्हा ऐरणीवर



हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार| हिंगोली, बुलढाणा आणि यवतमाळ जिल्ह्यांत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कयाधू नदीला आलेल्या पुराचा परिणाम पैनगंगा नदीवर झाला असून नदी दुथडी भरून वाहत आहे. परिणामी गांजेगाव पुलावरून पाणी वाहू लागल्याने विदर्भ–मराठवाड्यादरम्यानचा महत्त्वाचा संपर्क पुन्हा एकदा खंडित झाला आहे. या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून शेकडो प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.



दरम्यान, पैनगंगा नदीची पाणीपातळी वाढत असल्याने यवतमाळ जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. नदीपात्र, पूल आणि सखल भागात जाणे टाळावे तसेच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.



विशेष म्हणजे, ढाणकी मार्गे विदर्भाकडे जाणाऱ्या गांजेगाव बंधाऱ्याची उंची वाढविण्याची मागणी मागील अनेक वर्षांपासून होत असतानाही प्रशासनाने त्याकडे सातत्याने दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांतून केला जात आहे. प्रत्येक पावसाळ्यात पैनगंगा नदीला पूर आल्यानंतर पुलावरून पाणी वाहते आणि हा मार्ग बंद पडतो. परिणामी नागरिकांना बोरी पुलामार्गे १५ ते २० किलोमीटरचा अतिरिक्त फेरा मारून प्रवास करावा लागतो.



वारंवार उद्भवणारी ही समस्या कायमस्वरूपी सोडविण्यासाठी गांजेगाव बंधाऱ्याची उंची तातडीने वाढवावी, अशी जोरदार मागणी हिमायतनगर, पळसपूर, डोलारी, सिरपल्ली व परिसरातील शेतकरी आणि नागरिकांनी केली आहे. अन्यथा दरवर्षी पावसाळ्यात जनतेला याच त्रासाला सामोरे जावे लागणार असल्याची तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
