
नांदेड| स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने (स्वारातीम) राष्ट्रीय हरित विद्यापीठ रँकिंग (NGUR) २०२६ मध्ये देशात १२ वा क्रमांक पटकावत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विद्यापीठाला १०० पैकी ९२.५ गुण मिळाले असून ‘गोल्ड रेटिंग’ प्राप्त झाली आहे. आयआयटी, एनआयटी, ट्रिपल आयटी आणि केंद्रीय विद्यापीठांसह देशातील प्रतिष्ठित संस्थांमध्ये हे यश मिळविल्याने विद्यापीठाच्या शाश्वत विकास उपक्रमांची राष्ट्रीय स्तरावर दखल घेतली गेली आहे.
या यशामुळे विद्यापीठाला न्यूयॉर्क येथे होणाऱ्या ’10th NYC Green School Conference 2026′ मध्ये आंतरराष्ट्रीय सन्मानासाठी निमंत्रण मिळाले आहे. महाराष्ट्रातील सार्वजनिक अकृषिक विद्यापीठांमध्ये या क्रमवारीत स्थान मिळविणारे स्वारातीम हे एकमेव विद्यापीठ ठरले आहे.



पर्यावरणीय प्रशासन, जैवविविधता, कार्बन व हवामान कृती, हरित पायाभूत सुविधा, ऊर्जा कार्यक्षमता, जलव्यवस्थापन, कचरा व्यवस्थापन, संशोधन, अभ्यासक्रम आणि सामुदायिक सहभाग या दहा निकषांवर विद्यापीठाचे मूल्यमापन करण्यात आले.



विद्यापीठ परिसरात २८७ KWH क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प, सुमारे ३५ हजार वृक्षांची लागवड, १० हेक्टर जैवविविधता उद्यान, ४ हेक्टर बॉटनिकल गार्डन, रेन वॉटर हार्वेस्टिंग तसेच सुमारे ५५० एकरांचा हरित परिसर विकसित करण्यात आला आहे. याशिवाय कचरा व्यवस्थापन, हरित तंत्रज्ञान संशोधन आणि शाश्वत विकासाशी संबंधित विविध उपक्रमही प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत.


कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी हे यश विद्यापीठातील सर्व प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या सामूहिक प्रयत्नांचे फलित असल्याचे सांगितले. आगामी काळात १०० टक्के हरित ऊर्जा आणि Net-Zero उद्दिष्टाच्या दिशेने अधिक प्रभावी पावले उचलण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.


