हिमायतनगर तालुक्यात दमदार पावसाची हजेरी; खरीप पिकांना जीवदान

हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार | हिमायतनगर शहर व तालुक्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेल्या रिमझिम पावसाचा जोर गुरुवारी सकाळपासून वाढल्याने शेतकरी व नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मध्यंतरी काही दिवस पावसाने उघडीप दिल्यामुळे पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या खरीप पिकांना या मुरवणी पावसामुळे नवसंजीवनी मिळाली असून शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

गेल्या काही दिवसांपासून या भागात अधूनमधून सुरू असलेल्या मौसमी पावसामुळे खरीप पिकांची स्थिती सुधारत आहे. यंदा पिके चांगली उभी असली तरी अपेक्षित वाढ न झाल्याने उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता शेतकरी व्यक्त करत आहेत. मात्र, सध्या सुरू असलेला पाऊस पिकांच्या वाढीसाठी अत्यंत पोषक ठरत असल्याचे कृषी जाणकारांचे मत आहे.

दरम्यान, सततच्या पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांनाही मोठा दिलासा मिळाला आहे. तरीही अद्याप तालुक्यात एकही मोठा मुसळधार पाऊस झालेला नसल्याने ओढे-नाले वाहण्यास सुरुवात झालेली नाही. भूजल पातळीत वाढ होण्यासाठी, जलस्रोत भरून निघण्यासाठी आणि भविष्यातील पाणीटंचाई टाळण्यासाठी दमदार पावसाची आवश्यकता असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

महसूल विभागाच्या माहितीनुसार, ३० जुलै रोजी सरसम मंडळात ५६ मि.मी., हिमायतनगर वर्तुळात ५६.५ मि.मी. तर जवळगाव मंडळात २८.८ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. हिमायतनगर तालुक्याचा वार्षिक सरासरी पाऊस ८६७.३० मि.मी. अपेक्षित असून, पावसाळ्याच्या सुरुवातीपासून आजपर्यंत २५५.७० मि.मी. पावसाची नोंद झाली असल्याची माहिती महसूल सहाय्यक गोविंद पांपटवार यांनी दिली.

हवामान विभागाने पुढील काही दिवस पावसाचा अंदाज व्यक्त केल्याने शेतकरी वर्गाच्या अपेक्षा वाढल्या आहेत. सुरू असलेल्या पावसाचे दमदार स्वरूपात रूपांतर होऊन नद्या, नाले आणि जलस्रोत भरावेत, तसेच शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही मार्गी लागावा, अशी अपेक्षा शेतकरी व नागरिक व्यक्त करत आहेत.

“तालुक्यात सुरू असलेला पाऊस खरीप हंगामासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. आतापर्यंत २५५.७० मि.मी. पावसाची नोंद झाली असून पुढील काळातही चांगला पाऊस झाल्यास शेतीसह जलसाठ्यांनाही मोठा फायदा होईल.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!