
लोहा| लोहा तालुक्यातील भिवरा नदीच्या प्रवाहात वाढ झाल्याने साजा उमरा अंतर्गत उमरा–परसराम तांडा–रूपसिंग तांडा मार्गावरील पुलावरून पुराचे पाणी वाहू लागल्यामुळे गुरुवारी सायंकाळी सुमारे ५ वाजल्यापासून वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली होती. त्यामुळे या मार्गावरील संपर्क काही काळासाठी तुटला होता.



परिस्थिती लक्षात घेऊन प्रशासनाने नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले होते. रूपसिंग तांडा आणि परसराम तांडा येथील नागरिकांसाठी लाडका–गुंडा (ता. कंधार) मार्गे राष्ट्रीय महामार्ग १६१ए हा पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आला होता. तर उमरा येथील नागरिकांना उमरा–जोमेगाव मार्गे नांदेड–हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग (NH-161) वापरण्याचा सल्ला देण्यात आला.



दरम्यान, रात्रीपर्यंत भिवरा नदीच्या पाण्याचा प्रवाह कमी झाल्याने पुलावरील पाणी ओसरले आणि वाहतूक पुन्हा पूर्ववत सुरू करण्यात आली. प्रशासनाने नागरिकांना पावसाळ्यात पुलावरून पाणी वाहत असताना जीव धोक्यात घालून प्रवास करू नये तसेच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन केले आहे.


