वाहतूक नियमांचे पालन ही काळाची गरज; विद्यार्थ्यांनी जबाबदार नागरिक बनावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

नांदेड | रस्ते अपघातांचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी आणि विद्यार्थ्यांमध्ये वाहतूक नियमांविषयी जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने नांदेड येथील महात्मा फुले हायस्कूलमध्ये आयोजित विशेष वाहतूक सुरक्षा जनजागृती कार्यक्रमात जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले.

“वाहतूक नियमांचे पालन करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असून सुरक्षित वाहतूक ही काळाची गरज आहे. विद्यार्थ्यांनी लहानपणापासूनच रस्ता सुरक्षेचे नियम अंगीकारून जबाबदार नागरिक बनावे,” असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी यावेळी केले.

कार्यक्रमाला सेफ इंडिया रोड्स व अँटीकरप्शन टीम इंडियाचे डायरेक्टर घनश्याम ओझा, वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक जासपाल सिंग कोर्टतीर्थवाले, पोलीस उपनिरीक्षक अजय साखळे यांची उपस्थिती होती. यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी शाळेतील विज्ञान विभाग, क्रीडा विभाग आणि अटल टिंकरिंग लॅबमधील नाविन्यपूर्ण उपक्रमांची पाहणी करून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचे विशेष कौतुक केले. शिस्तबद्ध वातावरण, शैक्षणिक प्रगती आणि विविध क्षेत्रांतील विद्यार्थ्यांचा उल्लेखनीय सहभाग पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले.

कार्यक्रमादरम्यान शाळेचे सहशिक्षक, मराठी अभ्यास मंडळाचे सदस्य आणि साहित्यिक डॉ. राम वाघमारे यांनी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांना त्यांच्या स्वलिखित पाच पुस्तकांचा संच भेट देऊन सन्मानित केले. जिल्हाधिकाऱ्यांनी साहित्यकृतींचे कौतुक करत डॉ. वाघमारे यांच्या साहित्यसेवेचे अभिनंदन केले. कार्यक्रमास उपमुख्याध्यापक डॉ. अण्णा गरड, पर्यवेक्षक एस. व्ही. जाधव, शिक्षकवृंद तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!