
हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार | नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत हिमायतनगर गटातून शेतकरी विकास पॅनलचे उमेदवार तथा माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी अवघ्या एका मताच्या फरकाने विजय मिळवत सहकार क्षेत्रातील आपले वर्चस्व कायम राखले आहे. या विजयामुळे हिमायतनगरसह संपूर्ण जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून समर्थकांमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे.



या अटीतटीच्या लढतीत माधवराव पाटील जवळगावकर यांना ११ मते, तर त्यांचे प्रतिस्पर्धी विशाल राठोड यांना १० मते मिळाली. केवळ एका मताच्या फरकाने लागलेल्या या निकालाने निवडणुकीची चुरस अधोरेखित केली आहे. निकाल जाहीर होताच समर्थकांनी गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी आणि घोषणाबाजी करत विजयाचा जल्लोष साजरा केला. विविध राजकीय, सामाजिक आणि सहकार क्षेत्रातील मान्यवरांनी जवळगावकर यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.



समर्थकांनी हा विजय शेतकरी, सभासद आणि सहकार क्षेत्रातील विकासाभिमुख नेतृत्वावर मतदारांनी व्यक्त केलेल्या विश्वासाचा कौल असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून शेतकरी व सभासदांच्या हितासाठी अधिक प्रभावीपणे काम करण्याचा निर्धारही व्यक्त करण्यात आला.


दरम्यान, या विजयामुळे सहकार क्षेत्रातील आगामी सत्तासमीकरणांनाही वेग आला आहे. माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभा खासदार अशोकराव चव्हाण यांचे जवळगावकर यांना असलेले राजकीय मार्गदर्शन लक्षात घेता, त्यांची जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील महत्त्वाच्या पदावर वर्णी लागू शकते, अशी चर्चा राजकीय व सहकार वर्तुळात रंगू लागली आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. अवघ्या एका मताच्या फरकाने मिळालेला हा विजय केवळ निवडणुकीचा निकाल नसून, हिमायतनगरच्या सहकार आणि राजकीय समीकरणांना नवी दिशा देणारा ठरू शकतो, अशी चर्चा जिल्हाभर सुरू आहे.


