महापौरांचा अधिकाऱ्यांना दणका; स्वच्छता, पाणीपुरवठा आणि ड्रेनेज कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश

नांदेड, प्रतिनिधी| नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेच्या महापौर सौ. कविता संतोष मुळे यांनी शहरातील स्वच्छता, पाणीपुरवठा आणि मलनिस्सारण व्यवस्थेतील त्रुटींची गंभीर दखल घेत झोन क्रमांक १ व २ अंतर्गत येणाऱ्या विभागांचा संयुक्त आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना कडक निर्देश दिले. महापालिका मुख्यालयात झालेल्या बैठकीत नगरसेवकांनी आपल्या प्रभागांतील नागरिकांच्या समस्या आक्रमकपणे मांडत प्रशासनाला जाब विचारला.

बैठकीत झोन १ व २ मधील अनेक भागांत कमी दाबाने व विस्कळीत पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी समोर आल्या. त्यावर महापौरांनी जलवाहिन्यांवरील गळती २४ तासांत दुरुस्त करून पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आदेश दिले. दूषित पाण्याचा पुरवठा झाल्यास संबंधित अभियंत्याला जबाबदार धरले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

शहरातील अंतर्गत रस्ते व मुख्य चौकांमध्ये कचरा साचणार नाही यासाठी घंटागाड्या वेळेवर पाठविणे, नियमित झाडलोट करणे आणि आवश्यक तेथे स्वच्छता कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. तसेच अपूर्ण ड्रेनेज व रिस्टोरेशन कामांमुळे रस्त्यांवर सांडपाणी येत असल्याबद्दल नगरसेवकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. यावर ड्रेनेज चेंबरची तातडीने साफसफाई व दुरुस्ती तसेच उघड्या नाल्यांतील गाळ काढण्याचे आदेश देण्यात आले.

बैठकीत नगरसेवकांनी अपुरे स्वच्छता कर्मचारी, मुख्य ड्रेनेज वाहिन्यांची दुरवस्था आणि काही वस्त्यांमध्ये नवीन पाईपलाईनची गरज याकडे लक्ष वेधले. महापौरांनी प्रशासनाने नगरसेवकांशी समन्वय ठेवून कामांचे नियोजन करण्याचे निर्देश दिले. यावेळी उपमहापौर दीपकसिंह रावत, स्थायी समिती सभापती विरेंद्रसिंह गाडीवाले, माजी सभापती किशोर स्वामी, माजी महापौर जयश्री पावडे, गटनेते संदीपसिंह गाडीवाले, विविध नगरसेवक तसेच अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, शहर अभियंता आणि संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

बैठकीच्या शेवटी महापौर कविता मुळे यांनी, “नागरिकांना मूलभूत सुविधा देणे हे महानगरपालिकेचे प्रथम कर्तव्य आहे. पाणीपुरवठा व स्वच्छतेबाबतच्या तक्रारी खपवून घेतल्या जाणार नाहीत. अधिकारी प्रत्यक्ष क्षेत्रात जाऊन कामांची पाहणी करावी. कामात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी व कंत्राटदारांवर कठोर कारवाई केली जाईल,” असा इशारा दिला. तसेच पुढील आठवड्यात झालेल्या कामांचा पुनरावलोकन अहवाल सादर करण्याचे निर्देशही संबंधित विभागांना देण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!