आजमवाडी रस्त्यासाठी गावकऱ्यांचे चिखलात बसून सामूहिक आमरण उपोषण

रस्ता, स्मशानभूमी व गावाच्या नामांतराच्या मागण्यांसाठी संघर्ष तीव्र; प्रशासनाकडून निधी मिळताच कामाचे आश्वासन

लोहा| धावरी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या आजमवाडी (भगवानबाबा नगर) येथील ग्रामस्थांनी मूलभूत सुविधांच्या मागण्यांसाठी चिखलमय रस्त्यावर बसून सामूहिक आमरण उपोषण सुरू केले आहे. गावाला जाण्यासाठी आजही पक्का रस्ता नसल्याने नागरिकांना नदी-ओढ्याच्या पात्रातून जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

आजमवाडी हे सुमारे ८०० लोकसंख्येचे गाव असून लोहा शहरापासून अवघ्या सहा किलोमीटर अंतरावर आहे. धावरी-आजमवाडी ही संयुक्त ग्रामपंचायत असून सरपंचपदाचा मान आजमवाडीला मिळत असला, तरी गावाला आजपर्यंत मजबूत रस्ता उपलब्ध झालेला नाही. पावसाळ्यात गावाचा संपर्क अक्षरशः तुटत असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

ग्रामस्थांनी आठ दिवसांपूर्वी प्रशासनाला निवेदन देत मजबूत रस्ता, स्वतंत्र स्मशानभूमी आणि भगवानबाबा नगर नामांतरासंदर्भातील प्रलंबित प्रशासकीय निर्णय तातडीने घ्यावेत, अशी मागणी केली होती. “आता आश्वासन नको, कृती हवी,” असा इशाराही त्यांनी दिला होता. मात्र, प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने २८ जुलैपासून चिखलात बसून सामूहिक आमरण उपोषण सुरू करण्यात आले.

अशोक गीते, तुकाराम मुंढे, जयराम गीते, नाथराव कागणे आणि संतोष नागरगोजे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू असून गावातील महिला, पुरुष आणि ज्येष्ठ नागरिकही त्यात सहभागी झाले आहेत. ग्रामस्थांनी सांगितले की, यापूर्वीही १६ ऑक्टोबर २०१६ रोजी वाहत्या पाण्यात ओढ्यात बसून आमरण उपोषण करण्यात आले होते. त्यावेळी प्रशासन व लोकप्रतिनिधींनी रस्ता करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, दहा वर्षांनंतरही प्रत्यक्ष काम सुरू झाले नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे.

गावाच्या विकासासाठी अनेक वेळा प्रशासन, आमदार, खासदार व मंत्र्यांकडे लेखी निवेदने देऊन पाठपुरावा करण्यात आला. मात्र, केवळ आश्वासने मिळाली असून कोणतीही ठोस कृती झाली नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. त्यामुळे संघर्ष अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेत चिखलातच सामूहिक आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!