
हिमायतनगर,उत्कर्ष मादसवार| अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत कोट्यवधी रुपयांचा खर्च करून हिमायतनगर रेल्वे स्थानकाचे सुशोभीकरण करण्यात आले असले, तरी आजही अनेक मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्याने प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. केवळ रंगरंगोटी करून विकासाचा देखावा उभा करण्यात आला असून, प्रत्यक्षात प्रवाशांच्या दैनंदिन अडचणी मात्र कायम असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.



स्थानकावरील वेटिंग हॉल बहुतेक वेळा बंद राहत असल्याने महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांसह प्रवास करणाऱ्या कुटुंबांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. कोरोना काळापासून बंद असलेली पार्सल सेवा अद्याप सुरू न झाल्याने व्यापारी वर्गासह सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय होत आहे. स्थानक परिसरात रेल्वे पोलीस चौकी नसल्याने चोऱ्यांच्या घटना वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. प्लॅटफॉर्म परिसरात दारुड्यांचा वावर वाढल्याने महिला व प्रवाशांना असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून, तातडीने सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्याची मागणी होत आहे.



याशिवाय प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर रेल्वे कोच पोझिशन डिस्प्ले बोर्ड बसविण्यात आलेला नाही, त्यामुळे प्रवाशांना योग्य डब्याची माहिती मिळत नाही. स्थानकावर जाहिरातींसाठी आवश्यक असलेले एलईडी टीव्ही स्क्रीनही बसविण्यात आलेले नाहीत, त्यामुळे रेल्वेच्या संभाव्य महसुलावरही परिणाम होत असल्याचे बोलले जात आहे. प्रवाशांनी धनबाद एक्सप्रेसला हिमायतनगर येथे थांबा द्यावा, तसेच काजीपेठ एक्सप्रेसची सेवा पुन्हा सुरू करावी, अशी मागणी केली आहे. स्थानकावरील पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था नसून, अनेक ठिकाणी पाण्याच्या पाईपलाईनमधून गळती होत असल्याने उपलब्ध पाण्याचाही अपव्यय होत आहे.



एकूणच, कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च होऊनही हिमायतनगर रेल्वे स्थानकावर मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी आहे. केवळ बाह्य रंगरंगोटी करून विकास झाल्याचे चित्र निर्माण केले जात असून, प्रत्यक्षात प्रवाशांच्या दैनंदिन समस्या कायम असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. रेल्वे प्रशासनाने या सर्व बाबींची गंभीर दखल घेऊन तातडीने आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.


“हिमायतनगर रेल्वे स्थानकाचे सुशोभीकरण झाले असले, तरी प्रवाशांसाठी अत्यावश्यक असलेली प्रसाधनगृह व शौचालयाची सुविधा अद्याप उपलब्ध नाही. याचा सर्वाधिक फटका महिला प्रवाशांना बसत असून त्यांची मोठी गैरसोय होत आहे. नुकत्याच झालेल्या डीआरएम यांच्या पाहणीत केवळ रंगरंगोटीवर समाधान न मानता प्रवाशांच्या मूलभूत सुविधांकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने सुलभ शौचालय उभारावे,” अशी प्रवासी व नागरिकांकडून जोरदार मागणी होत आहे.
