
नांदेड| आषाढी वारीची भक्तिभावाने ओथंबलेली परंपरा आणि विठ्ठलनामाचा अखंड गजर सोमवारी नांदेडच्या रस्त्यांवर अक्षरशः अवतरला. गुजराती हायस्कूल, नांदेडच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य पायी दिंडीने शहरातील नागरिक आणि पालकांना साक्षात पंढरपूरच्या वारीचा दिव्य अनुभव दिला.



सकाळी सात वाजता शाळेच्या परिसरातून टाळ-मृदंग, वीणेचे सूर, अभंगांचा निनाद आणि “ज्ञानोबा-तुकाराम”, “पांडुरंग हरी”च्या जयघोषात दिंडीला प्रारंभ झाला. वारकरी वेशभूषेत सजलेले विद्यार्थी-विद्यार्थिनी, डोक्यावर तुळशीवृंदावन, हातात भगव्या पताका आणि मुखी विठ्ठलनाम… हे दृश्य पाहून नांदेडकर क्षणभर पंढरपूरच्या पावन भूमीतच पोहोचल्याची अनुभूती घेत होते.



दिंडीचे शहरातील विविध ठिकाणी उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. ठिकठिकाणी पुष्पवृष्टी, आरती आणि भक्तिभावाने दिंडीचे स्वागत झाल्याने वातावरण अधिकच मंगलमय झाले. दिंडीतील पारंपरिक रिंगण सोहळ्याने वारकरी परंपरेचे जिवंत दर्शन घडवले आणि उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात या संस्कृतीला मानवंदना दिली.


या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण ठरले ते साक्षात विठ्ठल-रुक्मिणीच्या वेशात सजलेले विद्यार्थी-विद्यार्थिनी. त्यांच्या देखण्या आणि भावपूर्ण सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. अनेकांनी या दैवी क्षणांचे छायाचित्रण आणि तात्काळ चित्रण करून हा अविस्मरणीय अनुभव आपल्या आठवणीत कायमचा जतन केला. पंढरपूरला प्रत्यक्ष वारी करण्याचे भाग्य ज्यांना लाभले नव्हते, अशा अनेक पालकांनी आणि नागरिकांनी या दिंडीमुळे “आज आम्ही नांदेडमध्येच पंढरीची वारी केली,” अशी भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केली. संपूर्ण परिसर विठ्ठलभक्तीने भारावून गेला होता.



या उपक्रमातून विद्यार्थ्यांना वारकरी संप्रदायाची समृद्ध परंपरा, संतांच्या विचारांचा वारसा, भक्ती, समता, सेवा आणि संस्कार यांचे प्रत्यक्ष शिक्षण मिळाले. शिक्षणाबरोबरच संस्कृती आणि अध्यात्माची जोपासना करणारा हा अभिनव उपक्रम उपस्थितांच्या मनावर दीर्घकाळ अधिराज्य गाजवणारा ठरला. या कामी संचालक मंडळातील पदाधिकाऱ्यांच्या प्रेरणेमुळे, मुख्याध्यापक, यांच्या प्रभावी नियोजनाने शिक्षकांच्या पुढाकाराने विद्यार्थी आणि विद्यार्थिनीचे यांचे कार्य गौरवास्पद ठरले. गुजराती हायस्कूलने आयोजित केलेली ही दिंडी केवळ सांस्कृतिक मिरवणूक नव्हती; ती भक्ती, संस्कार आणि महाराष्ट्राच्या वारकरी परंपरेचे जिवंत दर्शन घडविणारी एक अविस्मरणीय आध्यात्मिक पर्वणी ठरली.
