
कलावंतांच्या न्याय हक्कासाठी संघटन मजबूत करण्याचा निर्धार
हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार| कलावंतांच्या न्याय हक्कासाठी सदैव तत्पर असलेल्या पारंपरिक शाहीर लोककला संवर्धन मंडळाच्या हिमायतनगर शहराध्यक्षपदी प्रसिद्ध गायिका ज्योतीताई बेदरकर यांची निवड करण्यात आली आहे.



मंडळाचे संस्थापक अध्यक्ष त्रिरत्नकुमार मा. भवरे पत्रकार कामारीकर यांच्या आदेशान्वये ही नियुक्ती करण्यात आली. महिला प्रदेशाध्यक्षा उज्वलाताई भवरे, महिला जिल्हा नांदेड सचिव मीराताई जाधव पाटील, जिल्हा सरचिटणीस शाहीर सुभाष गुंडेकर, जिल्हा संघटक रमेशजी सरपे, जिल्हा सहसचिव राजू रणवीर यांच्या उपस्थितीत ज्योतीताई बेदरकर यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.



ज्योतीताई बेदरकर यांचे सामाजिक, सांस्कृतिक तसेच धार्मिक क्षेत्रातील कार्य उल्लेखनीय असून, त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. हिमायतनगर शहरासह वार्डनिहाय तसेच तालुक्यातील गावागावांमध्ये शाखा स्थापन करून वयोवृद्ध कलावंत, महिला व पुरुष कलावंतांना संघटित करण्याचा त्यांचा प्रयत्न राहणार आहे.


यावेळी जिल्हा महिला सचिव मीराताई जाधव पाटील यांनी सांगितले की, कलावंतांच्या न्याय हक्कासाठी संघटितपणे लढा देणे गरजेचे आहे. सध्या कलावंतांच्या मानधनासाठी ऑफलाइन अर्ज प्रक्रिया सुरू असून, पात्र कलावंतांना अर्ज कसा भरावा, याबाबत मार्गदर्शन करण्याचे आवाहन त्यांनी केले.


तसेच २९ ऑगस्ट रोजी किनवट येथे आयोजित जागर मेळाव्यास मोठ्या संख्येने पारंपरिक कलावंतांनी उपस्थित राहावे, असे आवाहनही करण्यात आले. अधिकाधिक कलावंतांनी मानधनासाठी ऑफलाइन अर्ज करावेत, यासाठी संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. ज्योतीताई बेदरकर यांच्या निवडीबद्दल हिमायतनगर तालुक्यातील कलावंत, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन होत आहे.
