
हिमायतनगर–भोकर राष्ट्रीय महामार्गावर १५ ते २० अपघातांत १० ते १२ जणांचा मृत्यू
हिमायतनगर, अनिल मादसवार| हिमायतनगर ते भोकर राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण होऊन अवघी पाच वर्षे झाली; मात्र काही वर्षांतच या महामार्गाला ठिकठिकाणी मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत. त्यातच गावांच्या मुख्य चौकात, बसथांब्यांवर आणि फाट्यांवर वाहनांचा वेग नियंत्रित करण्यासाठी आवश्यक स्पीड ब्रेकर, बॅरिकेट किंवा सूचना फलक नसल्याने हा महामार्ग ‘मृत्यूचा सापळा’ ठरत असल्याचा संताप नागरिकांमधून व्यक्त होत आहे.



या मार्गावर आतापर्यंत झालेल्या सुमारे १५ ते २० अपघातांमध्ये १० ते १२ जणांना जीव गमवावा लागला असून, अनेक जण कायमचे अपंग झाले आहेत. तरीही संबंधित राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अभियंते व वरिष्ठ अधिकाऱ्यांना जाग येत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे.



आठ दिवसांत तीन बळी; प्रशासन अजूनही झोपेत?
मागील काही दिवसांत टाकराळा बु. फाटा आणि सोनारी फाटा येथे झालेल्या भीषण अपघातांत तीन युवकांचा मृत्यू झाला असून, दोघे जण गंभीर अवस्थेत मृत्यूशी झुंज देत आहेत. या घटनांनंतरही महामार्ग विभागाने ठोस उपाययोजना न केल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर सोनारी येथील नागरिकांनी हिमायतनगर दौऱ्यावर आलेले हदगाव–हिमायतनगर तालुक्याचे माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांची भेट घेतली. नागरिकांच्या मागणीची गंभीर दखल घेत जवळगावकर यांनी तातडीने राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अभियंता श्री. देशपांडे तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधला.


‘अपघातांची मालिका थांबविण्यासाठी तातडीने धोकादायक ठिकाणी स्पीड ब्रेकर बसवा, बॅरिकेट लावा आणि आवश्यक सूचना फलक उभारून भरधाव वाहनांवर नियंत्रण आणा,’ अशी स्पष्ट मागणी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे केली. हिमायतनगर शहरातील मुख्य चौकासह सरसम, इंदिरानगर, टेंभी फाटा, करंजी, सोनारी फाटा, पारवा, मोरगाव फाटा, टाकराळा फाटा, राजवाडी फाटा, वायवाडी, वडगाव यांसह इतर धोकादायक ठिकाणी स्पीड ब्रेकर, बॅरिकेट आणि अपघात प्रतिबंधक सूचना फलक उभारण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.


‘आणखी किती बळी गेल्यावर जागे होणार?’
“पाच दिवसांपूर्वी टाकराळा बु. फाट्यावर झालेल्या भीषण अपघातात दोन युवकांनी जीव गमावला. त्यांच्या अंत्यविधीसाठी निर्मल येथून सोनारीला आलेल्या युवकांपैकी एकाचा सोनारी फाट्यावरील अपघातात मृत्यू झाला. अवघ्या काही दिवसांत एका कुटुंबावर आणि संपूर्ण सोनारी गावावर दुःखाचा डोंगर कोसळला. अशा दुर्दैवी घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी गंभीर दखल घेत संबंधित विभागाला तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले,” अशी प्रतिक्रिया नागरिकांनी दिली.
यावेळी नगराध्यक्ष शेख रफिक शेख मेहबूब, उपनगराध्यक्ष विनोद गुंडेवार, स्वीय सहाय्यक अजय सूर्यवंशी, सुभाष दादा राठोड, गजानन सूर्यवंशी, संजय माने, माजी नगराध्यक्ष अखिल भाई, समद भाई, श्रीदत्त पाटील सोनारीकर, ज्येष्ठ पत्रकार परमेश्वर गोपातवाड, अनिल मादसवार, सोपान बोंपीलवार, अशोक अनगुलवार यांच्यासह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, सोनारी येथील कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
आता तरी महामार्ग विभाग जागा होणार का?
नागरिकांच्या आक्रोशानंतर आता राष्ट्रीय महामार्ग विभाग धोकादायक चौकांवर स्पीड ब्रेकर, बॅरिकेट व सूचना फलक उभारून ठोस पाऊल उचलणार का, की आणखी एखाद्या निष्पापाचा बळी गेल्यानंतरच प्रशासन जागे होणार, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
