
आमदार बालाजी कल्याणकरांकडे सी.सी. रस्ता व ड्रेनेजची मागणी
नांदेड, प्रतिनिधी| शहरातील वामन पावडे मंगल कार्यालय ते छत्रपती नगर, उमा महेश कॉलनी आणि आशिष नगरकडे जाणाऱ्या महत्त्वाच्या रस्त्याची गेल्या अनेक वर्षांपासून दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेले मोठमोठे खड्डे, पावसाळ्यात साचणारे पाणी आणि चिखलामुळे नागरिक अक्षरशः त्रस्त झाले आहेत. या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी परिसरातील नागरिकांनी नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर यांची भेट घेत निवेदन दिले.



हा रस्ता परिसरातील अनेक वस्त्या आणि गल्लींना पूर्णा रोड तसेच छत्रपती चौकाशी जोडणारा महत्त्वाचा मार्ग आहे. मात्र, रस्त्याची दुरवस्था झाल्याने वाहनचालक, पादचारी, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने रस्ता ओळखणेही कठीण होते. परिणामी घसरून पडण्याच्या घटना तसेच छोटे-मोठे अपघात घडत असल्याचे नागरिकांनी सांगितले.



‘विकासाच्या शहरात नागरिकांना खड्ड्यांतून मार्ग काढावा लागत आहे,’ अशी नाराजी व्यक्त करत नागरिकांनी या रस्त्याचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची मागणी केली. केवळ डागडुजी न करता या ठिकाणी कायमस्वरूपी सी.सी. रस्ता आणि ड्रेनेज लाईन उभारण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. नागरिकांचे म्हणणे ऐकून घेत आमदार बालाजी कल्याणकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने प्रस्ताव सादर करून निधीची मागणी करण्याचे आश्वासन दिले.


यावेळी शिवसेना नांदेड उत्तर महिला आघाडीच्या उपजिल्हाप्रमुख सौ. माधुरीताई धुळेकर पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच रामदास पाटील, कोटलावार, लक्ष्मण वडजे, बालाजी चक्रधर, विजय चव्हाण, ॲड. जे. एम. आठवले, राजेश इटकापल्ले, रामदास कांबळे, उद्धव पाटील, महाजन यांच्यासह परिसरातील ज्येष्ठ नागरिक, शिक्षक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


‘आता आश्वासन नव्हे, प्रत्यक्ष काम कधी?’
नागरिकांच्या मागणीनंतर आमदारांनी निधीसाठी प्रस्ताव पाठविण्याचे आश्वासन दिले असले तरी, या रस्त्याचे प्रत्यक्ष काम कधी सुरू होणार, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. खड्ड्यांच्या समस्येतून कायमची सुटका करून सी.सी. रस्ता व ड्रेनेजची सुविधा तातडीने उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
