आषाढी एकादशीनिमित्त हिमायतनगरात भक्तिमय वातावरण; नगरप्रदक्षिणा दिंडीत विठूनामाचा गजर

हिमायतनगर (वाढोणा),उत्कर्ष मादसवार| यंदाचा खरीप हंगाम सुख-समृद्धीचा जावो, भरपूर पाऊस पडून पीकपाणी भरभरून यावे आणि शेतकरी तसेच सर्वांच्या घरात सुख-समृद्धी नांदावी, अशी प्रार्थना करीत आषाढी एकादशीनिमित्त हिमायतनगर (वाढोणा) शहरातील शेकडो भाविकांनी विठ्ठल-रुख्माई व श्री परमेश्वराचे दर्शन घेतले.

श्रीक्षेत्राचा दर्जा प्राप्त हिमायतनगर (वाढोणा) येथील श्री परमेश्वर मंदिरात अनादिकाळापासून आषाढी एकादशीचा उत्सव भक्तिभावाने साजरा केला जातो. देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त शनिवार, दि. २५ रोजी मंदिरातील विठ्ठल-रुख्माईच्या दर्शनासाठी सकाळपासूनच वारकरी संप्रदायातील महिला-पुरुष भाविकांची मोठी गर्दी झाली होती. दर्शनासाठी आलेल्या भाविकांना अनेक भक्तांकडून केळी व राजगिरा लाडूचा प्रसाद वाटप करण्यात आला. सकाळी ६ वाजता पुरोहित कांतागुरु वाळके यांच्या मधुर वाणीतून विठ्ठल-रुख्माई अभिषेक सोहळा पार पडला. मंदिराचे संचालक संजय माने यांनी सपत्नीक अभिषेक केला.

सायंकाळी ५ वाजता परंपरेनुसार शहरातील भजनी मंडळे तसेच वारकरी महिला-पुरुष भक्तांच्या सहभागातून नगरप्रदक्षिणा दिंडीला सुरुवात झाली. दिंडीपूर्वी मंदिराच्या सभागृहात महिला व पुरुष भजनी मंडळांच्या वतीने भजनाचा कार्यक्रम झाला. त्यानंतर टाळ-मृदंगाच्या गजरात आणि ‘विठ्ठल-विठ्ठल’ नामस्मरण करीत नगरप्रदक्षिणा काढण्यात आली. दिंडीत चिमुकल्यांनी विठ्ठल-रुख्मिणीची वेशभूषा परिधान करून सहभाग घेतला. शहरातील तसेच बाहेरील विविध मंदिरांतील देवी-देवतांचे दर्शन घेत भाविकांनी जणू पंढरपूरच्या वारीचा अनुभव घेतला. टाळ-मृदंगाचा निनाद, भजनी मंडळांचा गजर आणि विठूनामाच्या जयघोषामुळे संपूर्ण शहर भक्तिमय वातावरणाने भारावून गेले होते.

oplus_16

शेकडो वर्षांची परंपरा कायम ठेवत श्री परमेश्वर मंदिर समितीच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेली नगरप्रदक्षिणा दिंडी पुन्हा मंदिरात परतल्यानंतर भजन-कीर्तन आणि प्रसाद वाटपाने उत्साहात सांगता झाली. दिंडीत श्री परमेश्वर महिला व पुरुष भजनी मंडळांसह शेकडो महिला-पुरुष, बालगोपाल आणि वारकरी संप्रदायातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

आषाढी एकादशीनिमित्त हिमायतनगरात भक्तिमय वातावरण!
श्रीक्षेत्र हिमायतनगर (वाढोणा) येथील श्री परमेश्वर मंदिरात आषाढी एकादशी उत्साहात साजरी करण्यात आली. विठ्ठल-रुख्माईचे दर्शन घेण्यासाठी सकाळपासून भाविकांची गर्दी झाली होती. सायंकाळी टाळ-मृदंगाच्या गजरात, ‘विठ्ठल-विठ्ठल’ नामस्मरण करीत शहरातून भव्य नगरप्रदक्षिणा दिंडी काढण्यात आली. चिमुकल्यांनी विठ्ठल-रुख्मिणीची वेशभूषा साकारत दिंडीत सहभाग घेतला. यंदाचा खरीप हंगाम सुख-समृद्धीचा जावो, भरपूर पाऊस पडून पीकपाणी भरभरून यावे आणि शेतकरी बांधवांसह सर्वांच्या घरात सुख-समृद्धी नांदावी, अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!