मुदखेड–आदिलाबाद रेल्वे मार्गावरील स्थानकांच्या विकासकामांचा डीआरएमकडून आढावा

अमृत भारत स्थानक योजनेतील कामे निर्धारित वेळेत आणि गुणवत्तापूर्ण पूर्ण करण्याचे निर्देश
नांदेड, अनिल मादसवार| दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम) प्रदीप कामले यांनी नांदेड–आदिलाबाद रेल्वे मार्गावरील मुदखेड, भोकर, हिमायतनगर, किनवट आणि आदिलाबाद या स्थानकांची पाहणी करून विविध विकासकामे व प्रवासी सुविधांचा आढावा घेतला.

डीआरएम कामले यांनी रेल्वे मार्गाची रिअर विंडो निरीक्षणाद्वारे तपासणी केली. त्यानंतर अमृत भारत स्थानक (ABS) योजने अंतर्गत सुरू असलेल्या विकासकामांच्या प्रगतीची पाहणी केली. स्थानकांवरील प्रवासी सुविधा, प्रतीक्षालये, सर्क्युलेटिंग एरिया, वाहनतळ, फलाट, स्वच्छता आणि एकूण देखभालीचीही त्यांनी पाहणी केली.

अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत सुरू असलेली सर्व कामे निर्धारित वेळेत, उच्च दर्जाने आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करावीत, असे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. कामांच्या गुणवत्ता व गतीवर सातत्याने लक्ष ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.

स्थानकांचे आधुनिकीकरण झाल्यानंतर प्रवाशांना अधिक सुलभ, सुरक्षित आणि आरामदायी सुविधा उपलब्ध होतील. विकासकामे सुरू असताना रेल्वे वाहतूक सुरक्षित ठेवण्याबरोबरच प्रवाशांना कमीत कमी गैरसोय होईल, याची विशेष काळजी घेण्याचे निर्देशही डीआरएम कामले यांनी दिले.

या पाहणीदरम्यान अभियांत्रिकी, वाणिज्य, परिचालन, विद्युत, टीआरएसओ, बांधकाम तसेच सिग्नल व दूरसंचार विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!