
NEET परीक्षेतील गैरप्रकार आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरून देशभर आंदोलन
नवी दिल्ली| NEET परीक्षेतील कथित गैरप्रकार, परीक्षा व्यवस्थेतील अनियमितता आणि विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांवरून देशभरात सुरू असलेल्या आंदोलनाला अखेर मोठे यश मिळाले आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर विद्यार्थी, सामाजिक तसेच आंबेडकरी संघटनांकडून या निर्णयाचे जोरदार स्वागत करण्यात आले.



विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरून देशभरात उभ्या राहिलेल्या आंदोलनाने अखेर सत्तेच्या दरवाजावर धडक दिली. परीक्षा गैरप्रकाराविरोधात आणि विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी रस्त्यावर उतरलेल्या विद्यार्थी शक्तीसमोर केंद्र सरकारला माघार घ्यावी लागल्याची प्रतिक्रिया विविध संघटनांनी व्यक्त केली.



धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचे स्वागत करताना संघटनांनी हा केवळ एका मंत्र्याचा राजीनामा नसून, विद्यार्थ्यांच्या संघर्षाचा आणि लोकशाही मार्गाने लढलेल्या आंदोलनाचा विजय असल्याचे म्हटले आहे. शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकता, परीक्षा प्रक्रियेतील विश्वासार्हता आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या प्रश्नावर सरकारने जबाबदारी निश्चित करणे आवश्यक असल्याची मागणीही यावेळी करण्यात आली.


‘विद्यार्थ्यांचा आवाज दाबता येत नाही, संघटित संघर्षापुढे सत्तेलाही झुकावे लागते,’ असा संदेश या आंदोलनातून देशभर गेला असून, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यामुळे विद्यार्थी आंदोलनाला मोठे नैतिक बळ मिळाले आहे.


